मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या टप्प्यातील सर्वाधिक चर्चित व महत्वाचा मतदारसंघ नंदिग्रामसह चार जिल्ह्यांच्या ३० विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण, नंदीग्रामचा संग्राम ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व १०,६२० मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. केंद्रीय सैन्याच्या सुमारे ६५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत मतदान होईल.
नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे त्यांचे जुने सहकारी, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी लोकांना घरा बाहेर पडून निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष नंदीग्रामवर आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. नंदीग्रामला विकास हवा आहे की जातीयवादी राजकारण हे लोकांना बघायचं आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी मतदानानंततर दिली.
मतदारांना नंदीग्राममध्ये मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप
तृणमूल कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) वर गंभीर आरोप केले. पूर्व मेदिनीपुरातील दक्षिण २४ परगणा, मोयना आणि नंदीग्राम विधानसभा जागांवर मतदारांना मत देण्यास रोखले असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की, नंदीग्रामच्या बिरुलिया झोनमध्ये १३१ आणि गोकुळनगर झोनमधील २४७ आणि २४८ बूथवर भाजपने कब्जा केला आहे. लोकांना आत जाऊ देत नाही आहे.