मुक्तपीठ टीम
उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता मकर संक्रांतीच्या दिनी गंगा स्नानावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विनय शंकर पांडे यांनी निर्देश दिले आहेत की, मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानासाठी हरकी पायडीसह सर्व गंगा घाटांवर कोणत्याही स्थानिक आणि बाहेरील व्यक्तीला जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही गंगेत स्नान करू दिले जाणार नाही.
कोरोनाची तिसरी लाट आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिनी स्नानाला बंदी घातली आहे. उत्सव स्नानासाठी जिल्हा आणि इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही परिस्थितीत स्नान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर हरकी पायडी परिसरात भाविक आणि स्थानिक लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
सण घरीच साजरा करण्याचे भाविकांना आवाहन
निरंजन पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांनी एका लेखी निवेदनाद्वारे भारतातील सनातनी भाविकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातच राहून आणि मानसिकदृष्ट्या गंगेत स्नान करून मकर संक्रांतीचा सण साजरा करावा, असे आवाहन केले आहे.
हरिद्वारमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढतायत
- हरिद्वार जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
- दररोज मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत.
- त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.
- १४ जानेवारीला मकर संक्रांती, मोठ्या संख्येने स्थानिक आणि इतर राज्यातील भाविक गंगा स्नानासाठी पोहोचतात.
- कोरोनाची तिसरी लाट आणि बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा दंडाधिकारी विनय शंकर पांडे यांनी सोमवारी सायंकाळी आदेश जारी करून मकर संक्रांतीच्या दिनी स्नानावर बंदी घातली आहे.
हरकी पायडी परिसरात प्रवेश प्रतिबंधित असेल
- हरकी पायडी परिसरात भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रवेशावर बंदी असेल.
- इतर जिल्ह्यांतून आणि राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.
- याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय शंकर पांडे यांनी सांगितले.
- जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे सांगितले.