मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना ग्रामविकास आणि नगरविकास विभागामार्फत मालमत्ता करातून सूट देणारी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी परिणामकारकपणे करावी, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
या योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाच्या सचिव सीमा व्यास, उपसचिव सरिता बांदेकर-देशमुख, नगरविकास, ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने प्रभावीपणे करुन देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा. क्षेत्रियस्तरावर योजनेच्या अंमलबजावणीकरिता दोन्ही विभागांनी परिपत्रक तातडीने निर्गमित करावे. ग्रामविकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवून योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत देखील या योजनेचा आढावा घ्यावा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी देखील या योजनेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.
राज्यातील ग्रामस्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत ग्रामविकास विभागाने ऑगस्ट 2020 मध्ये तर नगरविकास विभागाने सप्टेंबर 2020 मध्ये निर्णय घेतला. या दोन्ही विभागांच्या आदेशांचे एकत्रिकरण करुन बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत नोव्हेंबर 2020 मध्ये स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.