मुक्तपीठ टीम
अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिरात विराजमान श्री प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणे अवघ्या दोन वर्षात शक्य होणार आहे. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमीवरील राम मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचं दर्शन घेता येण्याची शक्यता आहे.
वेगानं बांधकाम, २०२३ अखेरीस दर्शन!
- सध्या अयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे.
- त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल.
- ७० एकर परिसरात मंदिर असणार आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
- मंदिर परिसरातच एक संग्रहालय आणि एक संशोधन केंद्र देखील उभारले जाईल.
- संग्रहालयातून लोकांना अयोध्या आणि राम मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती मिळू शकेल.
- श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनीअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली आहे.
गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. या भूमिपूजनाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं अयोध्येत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.