मुक्तपीठ टीम
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री (Multipurpose Artificial Insemination Worker In Rural India) म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे. अशा प्रशिक्षित व्यक्तींची पशुधनामध्ये कृत्रिम रेतन व इतर अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. यामुळे ग्रामीण गायी व म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दुध उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. तरी प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सांगली जिल्ह्यातही ही योजना असून स्थानिक तरुणांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते व जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम. पराग यांनी केले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिन्यांच्या कालावधीचा असून यामध्ये १ महिना क्लासरूम प्रशिक्षण व २ महिन्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण राहणार आहे. क्लासरूम प्रशिक्षण क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे व प्रात्यक्षिक प्रशिक्षण जिल्ह्यातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
अर्जदार हा किमान १२ वी उत्तीर्ण झालेला असावा व त्याचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती यांच्या कार्यालयात उपलब्ध होईल. सांगली जिल्ह्यामधून सर्वसाधारण प्रवर्गातून ८ व अनुसूचित जाती प्रवर्गातून १ याप्रमाणे ९ उमेदवारांची निवड सदर प्रशिक्षणासाठी करण्यात येणार असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले.