मुक्तपीठ टीम
जसं आजवर अनेकांच्या सत्ताकाळात घडलं तसंच आता पुन्हा झालं आहे. राज्य सरकारच्यावतीने उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी राळेगण सिद्धीला जाऊन तीन तास चर्चा केल्यानंतर ५० टक्के समाधान झाल्याचे जाहीर केलेल्या अण्णांनी आज ग्रामसभेच्या ठरावाचा आधार देत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. फक्त पूर्वी मंत्री आल्यानंतर अण्णांचं समाधान व्हायचं आता अधिकाऱ्यांवरही भागतं, अशी चर्चा मात्र रंगली आहे.
राज्य सरकारने किराणा माल मिळणाऱ्या सुपरमार्केटमध्येही वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. बिअरपेक्षा जास्त अल्कोहोल असणाऱ्या या मद्याच्या किरकोळ दुकानांमधील विक्रीविरोधात व्यसनलविरोधी संघटना, कार्यकर्ते यांनी जोरदार विरोध केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तर या निर्णया मागे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचा आरोप करून खळबळ माजवली होती.
तरीही न झुकणाऱ्या राज्य सरकारच्या वाइन धोरणाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला होता. प्रधान सचिव वल्सा नायर भेटून गेल्यानंतर रविवारी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.
वयाचा विचार करता उपोषण योग्य नाही!
- वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती राळेगण सिद्धीच्या ग्रामसभेने केली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा उपोषण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाले होते अण्णा हजारे?
- अण्णा हजारे यांनी वाईनविक्रीच्या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता.
- मात्र , सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
- आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला.
- दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल.
- त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही.
- ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून मी १४ फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण करीत आहे.