मुक्तपीठ टीम
राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परब अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परमबीर सिंहांच्या पत्रानंतर उघड झालेल्या महाराष्ट्रातील शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना शनिवारी समन्स बजावले होते आणि त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. याआधी एकदा समन्स बजावूनही न आलेल्या परब यांनी मंगळवारी मात्र हजेरी लावली.
परिवहन मंत्री अनिल परब मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी कार्यालयात हजर झाले. परब सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दल तेथे उपस्थीत होते. ईडी कार्यालयाजवळ पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य देणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी माझी मुलगी आणि बाळासाहेबांची शपथ घेतो, मी काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.
तीन वेळा विधानपरिषदेवर आमदार असलेल्या परब यांना यापूर्वी ईडीने ३१ ऑगस्टला हजर होण्यासाठी बोलावले होते पण त्यांनी आणखी वेळ मागितला होता.
ईडीकडे कोणती आहेत चौकशीची प्रकरणे?
- ईडी महाराष्ट्रातील पोलिसांच्या मदतीने चालू असलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करत आहे.
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हा आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
- या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना गेल्या एप्रिल महिन्यात त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
समन्स देऊनही अनिल देशमुख हजर झाले नाहीत
- अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ वेळा बोलावले आहे पण ते एकदाही हजर झाले नाहीत.
- हे टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, पण न्यायालयानेही दिलासा दिलेला नाही.
- ते म्हणालेत परमबीर सिंग यांनी हे आरोप केले, त्याआधी त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आले होते.
बडतर्फ पोलीस अधिकारी आणि अंबानी स्फोटके प्रकरणातील आरोपी वाझे यांच्या जबानीवर केली जाईल चौकशी
- मुकेश अंबानींच्या घराबाहेर विस्फोटक ठेवल्याबद्दल वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.
- या प्रकरणात सचिन वाझे यांनी दिलेल्या जबानीवर ईडी आज परबची चौकशी करू शकते.
- परब यांनी वाझे यांचे आरोप फेटाळून लावले असून ते कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
- वाझेनीं त्यांच्या एका निवेदनात सांगितले आहे की, परब यांनी त्यांना फसवणूकीच्या यादीत समाविष्ट केलेल्या कंत्राटदारांविरोधात जानेवारी २०२१ मध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि अशा ५० कंत्राटदारांकडून किमान २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते.