मुक्तपीठ टीम
सचिन वाझेंनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचे कारस्थान आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी मी त्यांचा जवळचा म्हणून मला लक्ष्य करण्यात येत आहे.
अॅड. परब यांनी वाझेंचा आरोप जून आणि जानेवारी महिन्यांमधील आहे तर मग मार्च महिन्यातील परमबीरांच्या पत्रात त्याचा उल्लेख का नाही, असा सवालही विचारला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. तसंच, माझ्या दोन मुलींची व बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. माझ्यावरील आरोप खोटे आहेत, मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वक्तव्यातील महत्वाचे मुद्दे:
- सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितलं नाही.
- परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही.
- पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे.
- यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे.
- त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्टोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
- माझी चौकशी करावी आणि चौकशीत सत्य बाहेर येईल.
- महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदाराशी माझी ओळख नाही.
- सचिन वाझेंनी केलेले दोन्ही आरोप धादांत खोटे आहेत. ते दोन्ही आरोप मी नाकारतोय.
- मी सच्चा शिवसैनिक आहेत. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत.
- भाजपला सचिन वाझे पत्राविषयी आधीच माहिती होती.
- गेले २-३ दिवस भाजपाचे पदाधिकारी आरडा ओरडा करत होते की आम्ही तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना दोन तीन दिवसांपासून या गोष्टींची कल्पना होती.
- सचिन वाझे आज एनआयए कोर्टात पत्र देणार होते याची कल्पना बहुतेक त्यांना आधीच असेल.