मुक्तपीठ टीम
आरोग्य तसेच इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञाच्या सल्यानुसार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लॉकडाऊन जाहीर केला व आता तो परिस्थितीमुळे वाढविला हे योग्यच होते. तथापि गेल्या ११ महिन्यात ४ महिने बाजारपेठा, दुकाने, व्यवसाय जवळपास संपूर्णपणे बंद राहिले आहेत. यामुळे राज्यांचे व अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आरोग्य व मनुष्यजीव हा महत्वाचा आहेच. मात्र, आर्थिक स्थिती पूर्वपदावर यायला किमान २ वर्षे लागणार आहेत हे नजरेआड करून चालणार नाही. कोरोना संपूर्णपणे नष्ट होण्यास बराच काळ लागणार असल्याचे मत विविध तज्ञ व्यक्त करीत आहेत पण म्हणून कायम लॉकडाऊन तर ठेवू शकत नाही. यावर उपाय म्हणून, स्वतः शहर नियोजन तज्ञ असलेल्या काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की, ज्या शहरात / जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले आहे तेथील १) दुकाने किमान आठवड्यातून १ वा २ दिवस तेसुद्धा अर्धा दिवस उघडण्याची परवानगी द्यावी वा २) उदा : अर्ध्या दुकानांना मंगळवारी व उरलेल्या दुकानांना शुक्रवारी उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी. वा ३) बाजारपेठेचे भाग पाडून पार्किंगप्रमाणे विभागवार “पी वन-पी टू” करून परवानगी द्यावी व परिस्थिती आणखी जशी सुधारेल त्याप्रमाणे एक-एक दिवस वाढवावा.
शिवाय, मुंबई-पुण्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक कार्यालयांना विभागवार आलटून-पालटून सुरु करण्याची कालांतराने परवानगी द्यावी. मुंबई-पुण्यामध्ये कार्यालयीन वेळात बदल करा ( स्टॅगर करा ) हि सूचना तर १९९७ सालीच एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रातील आपल्या लेखमालिकेतून केली होती. वरील बाबींमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.