मुक्तपीठ टीम
दहशतवाद्यांसाठी निधी उभा करणे आता सोपे राहणार नाही. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादासाठी निधी गोळा करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना मोकळीक दिली आहे. काश्मिरी व्यापारी, फुटीरतावादी, पाकिस्तानात बसून दहशतवादासाठी निधी गोळा करणाऱ्या दहशतवादी संघटना यांच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. शाहा यांनी दहशतवादी फंडिंगचे सर्व नेटवर्क उद्ध्वस्त करण्यास सांगितले आहे.
दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांना हे स्वातंत्र्य दिलं आहे. गेल्या वर्षी ३ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले होते. तुरुंगात बंदिस्त फुटीरतावादी नेता मसरत आलम, यासिन मलिक, शब्बीर शाह, बिट्टा कराटे यांसारख्या लोकांच्या संपर्कात अजूनही अनेक जण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जे देश-विदेशात बसून त्यांच्या इशाऱ्यावर निधी उभारत आहेत.
एनआयए आणि सर्व गुप्तचर संस्थांकडेही काही लोकांच्या नावांची यादी आहे, जे थेट रडारवर आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते. याशिवाय राजोरी, पुंछ, कुपवाडा आणि पंजाबमधील काही लोक दहशतवाद्यांसाठी निधी गोळा करत आहेत.
काही लोक पंजाबच्या तुरुंगातही आहेत, जे दहशतवाद्यांसाठी निधी गोळा करत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अमित शाहा यांना याबाबत माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी फंडिंगसाठी कुठेही आणि कोणतेही काम सुरू असले तरी त्याचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले पाहिजे, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. त्यांना यासाठी पूर्ण मुभा आहे.
माजी दहशतवाद्यांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर
- येत्या काही दिवसांत याबाबत एनआयए, एसआयए आणि पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
- ड्रग्जच्या माध्यमातून दहशतवाद्यांना फंडिंगही केले जात आहे.
- याबाबत कठोर कारवाई करण्याचीही तयारी सुरू आहे.
- काही माजी दहशतवाद्यांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर आहे.