मुक्तपीठ टीम
मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा मेसेज ज्या फोनमधून करण्यात आला होता तो आता दिल्लीच्या तिहार कारागृहातून जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल तुरुंगातील खोली क्रमांक ८ मध्ये बंद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडे होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
तिहार कारागृहात गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री ९.०० वाजेपर्यंत दिल्ली स्पेशल सेलनं तिहार कारागृहाची तपासणी केली. त्या तपासणीत इंडियन मुजाहिद्दीचा दहशतवादी तहसीन अख्तर याच्या बराकीमधून मोबाईल जप्त करण्यात आला. याच मोबाईलवरून टेलीग्राम चॅनल चालवले जात होते. या चॅनलच्या माध्यमातून अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. आता या मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी होणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
एनआयएने एका खासगी सायबर एजेंसीला फोन ट्रॅक करण्याचे काम सोपवले होते. पोलिसांना एका खाजगी सायबर एजेन्सीनं त्या फोनच्या लोकेशनबाबत माहिती दिली. ज्यावरुन टेलिग्राम चॅनल बनवलं होतं.
सिमकार्डचे लोकेशन तिहार कारागृह
- खासगी सायबर संस्थेने तयार केलेल्य अहवालानुसार, हे टेलिग्राम चॅनल २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्या मोबाईलमध्ये ‘टोर ब्राउजर’द्वारे व्हर्च्युअल क्रमांक तयार करण्यात आला.
- या नेटवर्कचा वापर डार्क वेब वापरण्यासाठी केला जातो.
- ज्या मोबाईलमधून हा संपूर्ण प्रकार करण्यात आला त्याच्या सिमकार्डचे लोकेशन तिहार कारागृह दाखवले होते.
- अँटीलियासमोर २४ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने २८ फेब्रुवारी रोजी घेतली होती.
- स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेने लिहिले होते की “हा तर फक्त ट्रेलर आहे, आम्हाला थांबवूनच दाखवा. तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या देखत दिल्लीत हल्ला केला होता, तुम्ही मोसादशी हात मिळवणी केली तरी काहीच करू शकला नाहीत. तुम्हाला आधीच सांगितले होते, पैसे ट्रांसफर करून टाका बस.”
- पण, दुसऱ्याच दिवशी आणखी एका टेलिग्राम चॅनलने हा दावा फेटाळून लावताना एक पोस्टर जारी केले होते.
काय आहे प्रकरण?
- २५ फेब्रुवारी रोजी अँटीलियासमोर स्कॉर्पिओ कार सापडली.
- ही कार २४ फेब्रुवारीच्याच मध्यरात्री ठेवण्यात आली होती.
- दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या कारमधून जिलेटीनच्या २० कांड्या जप्त केल्या.
- या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेनची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. त्याने आपली कार चोरीला गेल्याची तक्रारही दिली होती.
- ५ मार्च रोजी त्याचा मृतदेह सापडला. त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली.
आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक करत आहे.