मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केवळ २० दिवसांत एएमयूच्या १९ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांनी अलिगढमध्ये कोरोनाच्या वेगळ्या प्रकाराचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी त्यासाठी तपास करून मार्गदर्शन करण्यासाठी आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. त्यांच्या पत्रात दिलेल्या जास्त म्हणजे ३४ मृत्यू झाले असल्याच्या बातम्या काही हिंदी, इंग्रजी माध्यमांमध्ये आल्या आहेत.
अलिगड विद्यापीठाने आयसीएमआरला पाठवले पत्र
- अलिगड विद्यापीठ कुलगुरुंनी आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलाराम भार्गव यांना पत्र पाठविले आहे.
- कोरोना विषाणूचा नवीन प्रकार अलिगडमध्ये विकसित झाला आहे की नाही याची तपासणी करा. आमच्या प्रयोगशाळेने पाठविलेल्या कोरोना नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आयसीएमआरच्या संबंधित विभागाला निर्देश द्या.
- कोरोना संसर्गाची भीषणता वाढवणाऱ्या मुद्द्यांबद्दल मार्गदर्शन मिळालं तर त्यावर मात करणे शक्य होईल.
- कोरोनामुळे विद्यापीठ परिसर आणि आसपास राहणाऱ्या एएमयूच्या शिक्षक आणि इतर सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचे निधन झाले आहे.
- विद्यापीठाला लागून असलेल्या सिव्हिल लाईन्स भागात एक विशेष प्रकारचा विषाणू पसरत असल्याची शक्यता आहे.
जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या कोरोना प्रयोगशाळेतर्फे संकलित केलेल्या कोरोनाच्या नमुन्यांना पुढील चाचणीसाठी नवी दिल्लीतील सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अण्ड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीत पाठवण्यात आले आहे.