मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला यावर्षी २ वर्ष पूर्ण होतील. मात्र अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित सरकार स्थापनेचा घेतलेला निर्णय, शपथविधीचा तो दिवस आणि अजित पवारांची माघार हे भाजपाच्या चांगलाच वर्मी लागल्याचं दिसतंय. अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं ही चूक होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. अजितदादांना सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आता त्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे.
कामधंदा नसल्याने जुन्या गोष्टी उकरतात…
- त्या गोष्टीला आता १४ महिने झाले आहेत. तरीही मागची गोष्ट उकरून काढत आहेत.
- ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत.
- आज आनंदाचे वातावरण आहे. त्याकडे लक्ष द्या.
बॉम्बची भाषा करणाऱ्या नरेंद्र पाटलांवरही अजित पवारांची टीका
- काही लोक भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात.
- कायदा आणि संविधान काही बघत नाहीत.
- अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या बातम्या उचलून धरल्या जातात.
- ही लोकं एकेकाळी आमच्याबरोबर होती. त्यांचा अवाका आम्हाला माहीत आहे.
- शरद पवारही या लोकांना ओळखून आहेत. आम्हीच त्यांना आमदार केलं होतं. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही.
मराठा आरक्षणावरून पुनर्विलोकन याचिकेसाठी प्रयत्न
- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
- आपल्या न्याय व्यवस्थेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची संधी आहे.
- त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हा निकाल नीट वाचा. जवळच्या वकिलांना विचारा. त्यात कोर्टाने गायकवाड कमिशनवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.
- काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला भडकावण्याचं काम करत आहेत.
- पण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.
- त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो. आणखी वरिष्ठ नेत्यांना भेटायचं आहे. लवकरच भेटणार आहोत.