मुक्तपीठ टीम
काही लोकांच्या प्रेरणादायी कथेमुळे अनेकांना आपल्या जीवनात मार्ग मिळतात. जगण्याची आणि संघर्षाशी लढण्याची संधीही मिळते. अशीच एक कथा या अभिनेत्रीचीही आहे. जी ऐकून अनेकांना आपल्या आजारातून लढण्यास प्रेरणा मिळेल.
टेलिव्हिजन अभिनेत्री छवी मित्तलने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. वर्कआउट करताना झालेल्या दुखापतीनंतर तिला या आजाराची माहिती मिळाली. यानंतर ती डॉक्टरांकडे गेली आणि अनेक तपासण्या केल्यानंतर तिला बायोप्सीचा सल्ला देण्यात आला. तेव्हापासून ती तिच्या तब्येतीचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर देत आहे. आता तिच्यावर अंतिम शस्त्रक्रिया झाली असून तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
छवी मित्तलने तिचा शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर करत लिहिले की, “जेव्हा डॉक्टरांनी मला डोळे बंद करून काहीतरी चांगले विचार करायला सांगितले तेव्हा मला माझ्या सुंदर आणि निरोगी स्तनाचा विचार आला. यानंतर, जेव्हा मला काहीतरी कळले, तेव्हा मी कर्करोगमुक्त झाले होते. शस्त्रक्रिया सहा तास चालली, अनेक प्रक्रिया पार पडल्या आणि पुनर्प्राप्तीचा प्रवास आणखी लांबला. पण सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट म्हणजे आता सर्व काही ठीक होईल. जे वाईट होते ते गेले.”
तिने पुढे लिहिले की, “तुमच्या प्रार्थना माझ्या पाठीशी होत्या आणि आता मला त्यांची जास्त गरज आहे. कारण सध्या मला खूप वेदना होत आहेत आणि ही वेदना मला आठवण करून देते की मी माझ्या चेहऱ्यावर हास्य घेऊन एक मोठी लढाई जिंकली आहे. मी तुम्हा सर्वांसोबत अधिक माहिती शेअर करेन, पण माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. तरीही प्रार्थना करत राहा. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पतीशिवाय मी काहीही करू शकले नसते. जो माझ्यासारखाच धाडसी, धैर्यवान आणि काळजी घेणारा आहे. मोहित, मला तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू बघायचे नाहीत. #कर्करोगमुक्त”
छवी मित्तल यांनी शस्त्रक्रियेपूर्वी हॉस्पिटलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ती सर्जरीपूर्वी डान्स करून स्वत:ला तयार करताना दिसली होती. तिने व्हिडीओसोबत लिहिले की, डॉक्टरांनी मला शस्त्रक्रियेपूर्वी चिल राहण्यास सांगितले होते, त्यामुळे मी चिल आहे. लोक तिच्या धाडसाचे खूप कौतुक करत आहेत. प्रत्येकजण त्याच्या सकारात्मक वृत्तीने खूप प्रभावित झाला आहे.