मुक्तपीठ टीम
अयोध्येत श्री रामजन्मभूमी वर भव्य मंदिर बांधण्यासाठी देशभरातील सर्वाधिक निधी राजस्थानातून आला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्याचे मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत आहेत. मात्र, पराकोटीची श्रद्धा असल्याने राजस्थानवासीयांनी भरभरून निधी दिला आहे. राजस्थानातील ३६ हजार गावे व शहरांमधून ५१५ कोटी रुपयांचा निधी मंदिरासाठी जमवण्यात आला आहे. मकर संक्रांती ते माघी पौर्णिमेपर्यंत ४२ दिवस चाललेल्या मोहिमेमध्ये सुमारे ९ लाख कार्यकर्त्यांनी एक लाख ७५ हजार गटातून घरोघरी संपर्क साधला.
४ मार्चपर्यंत मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत २५०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून अंतिम आकडेवारी अद्याप येणे बाकी आहे. मंदिराच्या व्यासपीठासाठी मिर्जापूर जिल्हा आणि परकोटासाठी जोधपूरचा दगड लावण्याचा विचार सुरू आहे. तसेच मंदिरात भरतपूर जिल्ह्यातील बंशी पहाडपूरचा दगड लागेल. मंदिरासाठी ४०० फूट लांबी, २५० फूट रुंदी आणि ४० फूट खोलवरून माती बाहेर काढली जात आहे, त्यानंतर भरणीचे काम सुरू होईल. स्टफिंग मटेरियल आयआयटी मद्रासच्या वैज्ञानिकांनी तयार केले आहे.
कसे असणार अयोध्येतील श्री राम मंदिर?
• केवळ अडीच एकरात मंदिर बांधले जाईल.
• मंदिराच्या आजूबाजूला सहा एकरात पेरकोटा बांधला जाईल.
• पुराचा प्रभाव रोखण्यासाठी जमिनीच्या आत वेगळे कुंपण असेल.
• हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल.
• पर्यावरणाला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत.
• परिघाच्या बाहेरील उर्वरित ६४ एकर जागेवर काय बांधले पाहिजे यावर आर्किटेक्ट काम करत आहेत.
• आतले वातावरण सात्विक राखले जाईल.
• ऑगस्ट महिन्यात जयपूर येथील कंपनीने ७० एकर जागेचे सर्वेक्षण केले आहे.