मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाचही विभागांना प्रवाशांना रिर्झव्हेशन नसले तरी तिकिटे देण्याची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. सध्या, विशेष गाड्या चालवल्या जात आहेत आणि केवळ रिर्झव्हेशन केलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश आणि ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी आहे. आता भारतीय रेल्वे अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील आणि वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. रेल्वेने अधिकाऱ्यांना असे सांगितले आहे की ते रिर्झरव्हेशन नसलेल्या प्रवाशांना तिकिटांचे विविध प्रकार उपलब्ध करुन देतील. जेणेकरून मानवी हस्तक्षेप टाळता येईल, असे भुसावळ रेल्वे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेकडे स्वयंचलित तिकिट वेंडिंग मशीन (एटीव्हीएम), अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) मोबाइल अॅप्लिकेशन, नाणे चालवणारे तिकीट वेंडिंग मशीन (सीओटीएम) याशिवाय जन साधरण तिकिट बुकिंग सेवा (जेटीबीएस) यासारखे तिकीट विकत घेण्याचे अनेक मार्ग आहेत. याव्दारे प्रवाशांना तिकीट दिले जाऊ शकते.
ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही वेळी जास्त गर्दी होऊ नये, प्रवाशी सुरक्षित अंतर राखतील आणि तिकिट विक्री कोणत्या पद्धतीने केली जाऊ शकते त्याची योजना रेल्वे अधिकारी आखत आहेत.