मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या खार विभागात काही तरूणांनी दक्षिण कोरियन महिला युट्यूबरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दोघेही बराच वेळ तिच्या मागे लागले. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पण त्या महिला युट्यूबरने प्रचंड धैर्य दाखवले आणि ती या घटनेमुळे अजिबात खचली नाही. असे होऊनही ती भारतीय चांगुलपणा दाखवत राहील असे तिने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी या तरुणांना अटक केली आहे.
तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि भरभरून लाईक्सही मिळत आहे. विनयभंगाच्या घटनेनंतरही ती जगाला अद्भूत भारत दाखवत राहील असे तिने सांगितले.
महिला यूट्यूबरने मुंबई पोलिसांच्या जलद कारवाईचे केले कौतुक!
- दक्षिण कोरियाच्या महिला युट्युबरने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले की, मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे त्वरीत कारवाई केली आणि छेडछाड करणाऱ्या मुलांना अटक केली, ही खूप मोठी गोष्ट आहे.
- अशाप्रकारे पोलिसांची तत्परता इतर कोणत्याही देशात दिसत नाही.
- तिने सांगितले की, ती गेले तीन आठवडे मुंबईत राहात आहे आणि इथे बराच काळ राहण्याचा विचार करत आहे.
पीडित महिलेने ट्विट केले की, “काल रात्री लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी एका तरुणाने माझा छळ केला. प्रकरण वाढू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तो त्याच्या मित्रासोबत होता म्हणून निघून गेला. काही लोक म्हणाले की, मी खूप मैत्रीपूर्ण झाल्यामुळे आणि त्यांच्याशी बोलल्यामुळे असे झाले. या घटनेने मला स्ट्रीमिंगबद्दल पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे.”
काय आहे प्रकरण? जाणून घ्या…
- मुंबईच्या खार विभागात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर लाइव्हस्ट्रीमिंग करत होती.
- या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
- व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण त्याच्या मित्रासह महिलेच्या अगदी जवळ आला आणि तिने विरोध करूनही महिलेचा हात धरून तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
- महिला घटनास्थळावरून निघून जाऊ लागली तेव्हा तो तिचा मोटारसायकलवरून पाठलाग करू लागला.
- महिलेला तिच्या घरी सोडतो असे म्हणाला महिलेने त्याची ऑफर नाकारली.
- सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली.