भारतीय नौदल आपली ताकद आणखी वाढवू लागलं आहे. आपल्या युद्धनौकांची मारक क्षमता वाढविण्यासाठी आता त्यांना अधिक सुसज्ज केलं जाणार आहे. या युद्धनौकांसाठी लांब पल्ल्याची ३८ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यात येणार आहेत. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र सुमारे ४५० कि.मी पर्यंतचे लक्ष्य गाठण्यास सक्षम असेल.
ही क्षेपणास्त्रे विशाखापट्टणममध्ये बनवल्या जात असलेल्या युद्धनौकांमध्ये बसविली जातील. त्यानंतर या युद्धनौकांना लवकरच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केले जाईल. लांब पल्ल्याच्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांसाठी १ हजार ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. ब्रह्मोस हे युद्धनौकेचे मुख्य मारक शस्त्र असेल. यापूर्वीही अनेक युद्धनौकांमध्ये ते बसविण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाने आपल्या आयएनएस चेन्नई युद्धनौकेवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी केली. सागरी भागात ४०० कि.मी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य टिपण्याच्या क्षमतेची चाचणी करण्यात आली. पीजे-१० या प्रकल्पांतर्गत डीआरडीओने मोठ्या प्रमाणात स्वदेशात बनवलेल्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे निर्यात बाजार शोधण्याचे कामही भारत करीत आहे.
कोलकाता येथे सोमवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते ‘आयएनएस हिमगिरी’ या फ्रिगेट युद्धनौकाचे लोकार्पण करण्यात आले. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) यार्ड येथे प्रोजेक्ट १७-ए अंतर्गत तयार केले गेले आहे.
प्रोजेक्ट १७-ए अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या फ्रिगेट युद्धनौकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूच्या रडारच्या रेंजमध्ये येऊ शकत नाही. हा जीआरएसई प्रकल्प भारतीय नौदलाला सामर्थ्य देईल. या प्रकल्पांतर्गत ३ युद्धनौका बांधल्या जातील. दुसरी आणि तिसरी युद्धनौका २०२४ आणि २०२५ वर्षात आयोजित करणे अपेक्षित आहे.