मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. बुधवारी संध्याकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यावर त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी या अफवा असल्याचे सांगितले होते, पण आज त्यांची प्राणज्योत प्रत्यक्षात मालवली. त्यांचे वय ७७ वर्षे होते. गेल्या १७ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनानं संयत अभियनाच्या एका पर्वाची अखेर झाली आहे.
आज संध्याकाळी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ या वेगळ्या चित्रपटात त्यांचं अखेरचं दर्शन झालं.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमा ही तीनही माध्यमं गाजवले आहेत. रंगभूमीवरील त्यांचा अभिनयाची इनिंग खूप मोठी होती. ‘बॅरिस्टर’ नाटकाने विक्रम गोखलेंना नाव मिळवून दिले.
विक्रम गोखले हे दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र. विक्रम गोखले यांनी वयाच्या २६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. त्यांनी १९९० मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ आणि १९९९ मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये काम केले. विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये मराठी चित्रपट ‘अलोवी’ मधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विक्रम गोखले यांना २०११ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. विक्रम गोखले यांच्या पनजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. तर त्यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बाल कलाकार होत्या. १९८५ मध्ये विक्रम गोखले यांनी दूरदर्शनच्या नटखट नारद या मालिकेत महाविष्णूची भूमिका केली होती. जी आजही स्मरणात आहे. २०१६ मध्ये घशाच्या आजारामुळे गोखले रंगमंचावरून निवृत्त झाले, तरीही त्यांनी चित्रपटात काम करणे सुरू ठेवले.