मुक्तपीठ टीम
भारतातील जवळपास १३ टक्के ड्रग्स व्यसनी हे २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि या मुलांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून वाचवण्यासाठी समाजाने हस्तक्षेप आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. ‘फोर्थ वेब फाऊंडेशन’ यांनी UNODC आणि ‘वर्ल्ड फेडरेशन अगेन्स्ट ड्रग्स (WFAD)’ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय परिषद आयोजित केली होती.
अंमली पदार्थांपासून मुक्त बालपणाचा हक्क’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत, संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्स अँड क्राइम (यूएनओडीसी) कार्यालयाचे कार्यक्रम अधिकारी बिली बॅटवेअर म्हणाले की, मुलांवरील हिंसाचार, छळ आणि लैंगिक अत्याचारामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य खूपच कमकुवत होते आणि त्यांना ड्रग्स किंवा दारूच्या व्यसनाचा धोका वाढतो. ड्रग्स अँड ट्रान्सनॅशनल क्राइम अँड द रोल ऑफ सिव्हिल सोसायटी इन अ चाइल्ड्स वर्ल्ड या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत बॅटवेअर बोलत होते.
१० पैकी नऊ व्यसनी १८ वर्षे वयाच्या आधी ड्रग्स वापरण्यास सुरुवात करतात. २०२१-२५ च्या रणनीतीमध्ये, यूएनओडीसीने तरुणांची ताकद ओळखण्यासाठी आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी तीन प्रमुख वचनबद्धता समाविष्ट केल्या आहेत. मुलांची तस्करी, बालमजुरी आणि गुन्हेगारांकडून होणारा गैरवापर अनेकदा मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवतो आणि त्यांना ड्रग्स किंवा दारूच्या व्यसनचा धोका वाढतो. बहुतांश घटनांमध्ये मुले सामाजिक-आर्थिक अडचणी आणि संधींच्या अभावामुळे गुन्ह्यात अडकतात, असे बॅटवेअर म्हणाले.