मुक्तपीठ टीम
धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश झाले आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती. सरन्यायाधीश चंद्रचूड ऐतिहासिक निकाल देणार्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग राहिले आहेत. यात अविवाहित महिलांना गर्भपात, अयोध्या मंदिर आणि शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल देण्यात त्यांनी भूमिका बजावली.
डीवाय चंद्रचूड यांचे मोठे निर्णय
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नावावर असंख्य ऐतिहासिक निर्णय आहेत.
अयोध्या मंदिर
सरन्यायाधीश चंद्रचूड हे अयोध्या मंदिर वादावर निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती एसए बोबडे, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा समावेश होता.
सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार
देशातील अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्याच्या निर्णयातही त्यांची भूमिका होती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. विवाहित आणि अविवाहित सर्व महिलांना २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असे या निकालात म्हटले आहे.
गुन्ह्याच्या श्रेणीतून समलैंगिकता काढून टाकली
२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना समलैंगिकता गुन्ह्याच्या श्रेणीबाहेर असल्याचे म्हटले होते. दोन प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने समलैंगिक संबंध यापुढे गुन्हा मानला जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. हा निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचाही समावेश होता.
गोपनीयतेचा अधिकार
२४ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत जुना कायदा रद्दबातल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला होता. या घटनापीठात न्यायमूर्ती जेएस खेहर, न्यायमूर्ती जे.चेलमेश्वर, न्यायमूर्ती एस.ए .बोबडे, न्यायमूर्ती आर.के.अग्रवाल, न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती ए. एम. सप्रे, सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा समावेश होता. घटनापीठाने आपल्या आदेशात म्हटलं होतं की, “गोपनीयतेचा अधिकार घटनेत अंतर्भूत आहे. राज्यघटनेच्या कलम २१ मधील जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी यातून हा अधिकार बहाल करण्यात येतो.”
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा…
- सरन्यायाधीश चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होतील.
- सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते.
- विष्णू चंद्रचूड यांनी २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत हे पद भूषवले होते.
- सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले.
- त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून एलएलएम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.