मुक्तपीठ टीम
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे अधिक आक्रमकतेने राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यावरूनच भाजपाने आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपाने वरळी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते खासदार तेजस्वी सूर्या यांनी वरळीत येऊन आदित्य ठाकरेंना शड्डू देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आदित्य ठाकरेंना शड्डू देण्यासाठी आलेले तेजस्वी सूर्या कोण आहेत हे जाणून घेऊया…त्याचबरोबर त्यांचं वेगळंच कौशल्य आणि त्यांच्या रणनीतीचा शिवसेना कसा सामना करणार यावरही बोलूया.
मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केलेत…
- शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली.
- या यात्रेतून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांवर टीकेची झोड उठवली.
- त्यातच आता आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळेच आणि आगामी मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तेजस्वी सूर्या या तरुण राष्ट्रीय चेहऱ्याला मैदानात उतरवलं आहे.
- यावेळी बोलताना तेजस्वी सूर्या यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.
- मोदींनी अनेक गड-किल्ले उद्ध्वस्त केले आहेत, मुंबई मनपावरही भाजपा झेंडा फडकवेल, असं ते म्हणाले.
कोण आहेत तेजस्वी सूर्या?
- ३१ वर्षीय तेजस्वी सूर्या हे पेशानं वकील आहेत.
- तेजस्वी सूर्या हे कट्टर हिंदुत्ववादी आणि भाजपाच्या विचारधारेत घडलेले युवा नेते आहेत.
- त्यांची २०२० मध्ये भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
- तेजस्वी सूर्या हे बंगळुरु दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत.
- तेजस्वी सूर्या यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली आहे
- तेजस्वी सूर्या हे अरब महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे वादात सापडले होते.
काय होते तेजस्वी सूर्यांचं ट्वीट?
- २०१५ मध्ये त्यांनी,”आखाती देशांमधील ९५ टक्के महिलांनी गेली अनेक शतकं कामोत्तेजनेचं सर्वोच्च सुख असणाऱ्या ऑर्गेझमचा अनुभवच घेतलेला नाही. प्रत्येक आईने प्रेमाऐवजी लैंगिक संबंधातून मुले निर्माण केली आहेत”, असं ट्वीट केलं होतं.
- पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारिक फतेह यांच्या वक्तव्याचा हवाला देत त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे आंतराष्ट्रीय वाद उसळला.
- भारताचे आखाती देशांशी मैत्री संबंध आहेत, त्यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला.
- त्यानंतर तेजस्वी सूर्यां यांनी ते ट्विट डिलीट केले तरी त्यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करून यूजर्सनी जोरदार निशाणा साधला होता.
- त्यांच्या या ट्वीटमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
- या ट्विटबाबत हजारो आखाती देशांनीही सरकारकडे कारवाईची मागणी केली.
- पुढे केंद्र सरकारने कसंबसं तो वाद शांत केला. पण पुढे तेजस्वी सूर्यांवर कारवाई झाली नाहीच, उलट त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी मिळाली.
अर्थात आक्रस्ताळा वाटावा अशी आक्रमकता एवढंच तेजस्वी सूर्यांचं बळ नाही. त्यांची कारकीर्द पाहिली तर त्यांची डिजिटल वॉर कुशलता, कायदेशीर ज्ञान, भाषा प्रभूत्व आणि दमदार वक्तृत्व हे सारे गुणंही त्यांना मोठं कारण ठरतात.
२०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान व्हायरल भाषण सूर्यांचं राजकीय तेज वाढवणारं ठरलं!
त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुका होणार होत्या. तेजस्वी सूर्याने २२ मार्च २०१९ रोजी बंगळुरू येथे एका मेळाव्याला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणाचा एक भाग ट्विटरवर शेअर केला, जो व्हायरल झाला. आपल्या भाषणात तेजस्वी म्हणाले होते, “मोदींना रोखण्यासाठी सर्व भारतविरोधी शक्ती एकवटल्या आहेत, तर मोदींचा अजेंडा न्यू इंडिया निर्माण करण्याचा आहे, तर विरोधी शक्तींचा अजेंडा त्यांना रोखण्याचा आहे. त्यांच्याकडे कोणताही सकारात्मक अजेंडा नाही. जर तुम्ही मोदींसोबत आहात, तुम्ही भारतासोबत आहात. तुम्ही मोदींसोबत नसाल तर तुम्ही भारतविरोधी शक्तींना बळ देत आहात.
लोकसभा निवडणुकीत भाजपानं बंगळुरू दक्षिणमधून तिकीट दिले
निवडणूक प्रचारादरम्यान तेजस्वी सूर्याच्या या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांची मने जिंकली. यानंतर तेजस्वी सूर्याला लोकसभा निवडणुकीत बंगळुरू दक्षिणमधून तिकीट देण्यात आले. या जागेवरून भाजपचे अनंत कुमार खासदार होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्विनी या येथून पक्षाच्या उमेदवार असतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, पक्षाच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि तेजस्वी सूर्याला तिकीट मिळाले. तेजस्वीने निवडणुकीत दणदणीत विजय नोंदवला आणि वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी खासदार बनले.
तेजस्वी सूर्यांना जाणीवपूर्वक मिशन वरळीत उतरवलं?
- महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हापासूनच भाजपा आदित्य ठाकरेंना लक्ष्य करीत आहेत.
- सुशांत सिंह प्रकरण, दिशा सालियन प्रकरण प्रत्येक वेळी त्यात आदित्य ठाकरेंवर आरोप केले गेले, सिद्ध काहीच झाले नाही.
- सीबीआय तपासानंतरही नारायण राणेंसारखे केंद्रीय मंत्री आदित्य ठाकरेंवर आरोप करतात.
- दिशा सालियनच्या आईवडिलांच्या विनंतीनंतरही नको ते आरोप थांबत नाहीत.
- अशाच आक्रस्ताळ्या आरोपतंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या नेत्याला मुंबईतील वरळीत उतरवणं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी भाजपा आक्रमक मोहीम राबवण्याच्या विचारात असल्याची शक्यता, काही राजकीय जाणकार व्यक्त करतात.
आता प्रश्न एवढाच आहे की, भाजपा तर आपलं राजकीय लक्ष्य साध्य करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील योद्ध्यांना स्थानिक पातळीवर उतरवू लागली आहे, शिवसेना त्यांच्याशी सामना कसा करणार? कारण तिथं फक्त भावनात्मक नाही तर योग्य रणनीतीची डोकं न भडकवता डोकं वापरून तयार केलेली रणनीती आवश्यक असणार. शिवसेना तसं करू शकणार?