मुक्तपीठ टीम
गुजरात सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुका आणि दिवाळीच्या आधी सरकारने राज्यात सीएनजी आणि पीएनजीवरील कर १० टक्क्यांनी कमी केला आहे. मंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली आहे. गुजरात सरकारने एका वर्षात २ सिलिंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे.
PNG, CNGवरील कर घटवून, एका वर्षात २ सिलिंडर मोफत देणार- शिक्षण मंत्री जितू वाघानी
- गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय जाहीर केला.
- यामुळे नागरिक आणि गृहिणींना १ हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
- जवळजवळ ३८ लाख गृहिणींना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- जितू वाघानी म्हणाले की, या योजनेसाठी निश्चित केलेल्या ६५० कोटी रुपयांपैकी १ हजार ७०० रुपयांपर्यंतची रक्कम लोकांपर्यंत पोहोचू शकते.
ते म्हणाले की, सीएनजीमध्ये १० टक्के कपात केल्यास प्रति किलो ६-७ रुपये नफा मिळेल. त्याचप्रमाणे पीएनजीवर ५ ते ५.५० रुपये प्रति किलो नफा होणार आहे. याचा फायदा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरात निवडणुकीसाठी आयोगाने अद्याप घोषणा केलेली नाही. गुजरात निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे. तर, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. हिमाचलमध्ये मतदान आणि मतमोजणीमध्ये २६ दिवसांचे अंतर आहे.