मुक्तपीठ टीम
टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हटली जाणारी एकता कपूर तिच्या शोजमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यासोबतच तिचे वादांशीही जुने नाते आहे. आता एकताला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारल्याची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्माती एकता कपूरला तिच्या ‘थ्री एक्स’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह मजकुरासाठी फटकारले आहे.
या आक्षेपार्ह मजकूराबद्दल फटकारत, असे म्हटले आहे की, “ते या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहे.” एकताने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’ वर प्रसारित केलेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.”
वेब सिरीजमार्फत तरुण पिढीचे मन दूषित केले जात आहे
- न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, “काही तरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहात.
- ओटीटी कंटेंट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना नक्की काय दाखवत आहात?…उलट तरुणांची मने दूषित करत आहात.
‘या’ देशात निवडीचे स्वातंत्र्य आहे!
- एकता कपूरची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु हे प्रकरण लवकरच सुनावणीसाठी सूचीबद्ध होईल अशी आशा नाही.
- ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशाच एका प्रकरणात एकताला संरक्षण दिले होते.
- रोहतगी म्हणाले की, मालिकेतील मजकूर सदस्यतेवर आधारित आहे आणि या देशात निवडीचे स्वातंत्र्य आहे.
- यावर न्यायालयाने जनतेला कोणता पर्याय दिला आहे, अशी विचारणा केली.
बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती
- बिहारच्या बेगुसराय येथील न्यायालयाने माजी सैनिक शंभू कुमार यांच्या तक्रारीवरून एकता कपूरच्या विरोधात वॉरंट जारी केले होते.
- शंभू कुमार यांनी २०२० मध्ये याबद्दल तक्रार दाखल केली होती.
- ‘थ्री एक्स’ (सीजन-२) मध्ये सैनिकाच्या पत्नीचा संबंध असलेली अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवली होती, असा आरोप त्यांनी केला होता.