मुक्तपीठ टीम
पाकिस्तानातील मुलतान शहरातील एका सार्वजनिक रुग्णालयाच्या छतावर २०० हून अधिक कुजलेले मृतदेह सापडले आहेत. निश्तर रुग्णालयातील शवागाराच्या छतावर हे मृतदेह आढळून आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सरकारने दिले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. यातील बहुतांश मृतदेहांचे अंतर्गत अवयव काढल्याचेही आढळून आले आहे. तसेच, अनेक मृतदेहांच्या अवयवांना नीट टाकेही घातलेले नव्हते.
पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार चौधरी तारिक जमान गुज्जर यांना कोणीतरी मुलतानमधील निस्टार रुग्णालयाबद्दल गुप्त माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘मी निश्तर रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, तुम्हाला काही चांगलं काम करायचं असेल तर शवागारात जाऊन तपासणी करा.’
उघड्यावर मृतदेह सर्वत्र पसरलेले!!
- गुज्जर यांनी सांगितले की, जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा कर्मचारी शवागाराचा दरवाजा उघडण्यास टाळाटाळ करत होते.
- त्यावेळी चौधरी जमान गुज्जर यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना छताचे कुलूप उघडा अन्यथा पोलिसांत गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.
- यानंतर त्यांनी शवागाराचा दरवाजा उघडण्यास मान्य केले. तिथे जाऊन त्यांना आश्चर्य वाटले.
- गच्चीवर उघड्यावर मृतदेह सर्वत्र पसरले होते.
- त्यात पुरुष आणि स्त्रियांचेही मृतदेह होते, जे कुजत होते. मृतदेहांच्या आतून अंतर्गत अवयव गायब होते.
- अवयव काढल्यानंतर त्याच्या शरीराच्या कातडीला टाकेही घातले नव्हते.
गेल्या ५० वर्षांत अशाप्रकारचे भीषण दृश्य पाहिलं नाही- गुज्जर
- या प्रकाराबाबत गुज्जर यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता हे मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
- तेव्हा गुज्जर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना ‘तुम्ही लोक हे मृतदेह विकता का?’ असा प्रश्न केला.
- यावर डॉक्टरांनी तुम्ही जे विचार करत आहात तसे नसल्याचे सांगितले.
- गेल्या ५० वर्षांत अशाप्रकारचे भीषण दृश्य पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया या रुग्णालयाच्या भेटीनंतर गुज्जर यांनी दिली आहे.