मुक्तपीठ टीम
फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएफव्ही -एसएचईव्ही ) या भारतातील अशाप्रकारच्या टोयोटाच्या पहिल्या प्रायोगिक तत्त्वावरील वाहन प्रकल्पाचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आरंभ केला. हे वाहन १००% पेट्रोल तसेच २० ते १००% मिश्रित इथेनॉल आणि इलेक्ट्रिक उर्जेवर चालणार आहे. केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे, भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, कर्नाटकचे मंत्री डॉ. मुरुगेश निरानी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि.चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मसाकाझू योशिमुरा हे देखील यावेळी उपस्थित होते.
आत्मनिर्भर भारतासाठी कृषी विकास दरात ६ ते ८ टक्के वाढ आवश्यक आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना गडकरी यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अतिरिक्त अन्नधान्याचे आणि साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
‘अन्नदाता ‘ ‘ऊर्जादाता ‘ होण्यासाठी प्रोत्साहित करत मंत्री म्हणाले, हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे कार्यक्षेत्र तयार होईल आणि या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये नवा भारत हा जागतिक स्तरावर नेतृत्व करेल. नाविन्यपूर्ण, क्रांतिकारी,शाश्वत, किफायतशीर, ऊर्जा-कार्यक्षम असे हे तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान नव्या भारतातील वाहतूक क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट करेल, असे त्यांनी सांगितले.