मुले शाळेत असली तरी पालकांच्या मनात काळजी असतेच असते. ते शाळेत अभ्यास करत आहेत ना? उगाच कुठे उनाडक्या तर करत नाही? त्यांना कुणी त्रास तर देत नाही ना? एक ना अनेक चिंता पालकांच्या मनाला खात असतात. मात्र, किमान आता दिल्लीतील पालक लवकरच चिंतामुक्त होणार आहेत.
जर नियमित शाळा सुरू झाल्या तर १ एप्रिलपासून दिल्लीतील साडेसात लाख पालक घर बसल्या शाळेत असलेल्या मुलांवर लक्ष ठेऊ शकतील. पालकांना त्यांच्या मोबाइलवर ही सुविधा मिळू शकेल. दिल्ली सरकार यासाठी खास सीसीटीव्ही यंत्रणा बसवत आहे. १ एप्रिलपासून या पालकांना त्यांचे पासवर्ड पाठविले जातील. पीडब्ल्यूडी पालकांच्या मोबाइल नंबरची पडताळणी करीत आहे, कारण मोबाइल नंबर बदलल्यास ते अपडेट केले जाऊ शकते.
दिल्ली सरकारकडे १,०२८ शाळा आहेत. त्यामध्ये पंधरा लाखांहून अधिक मुले शिक्षण घेतात. या शाळा ७२८ इमारतींमध्ये आहेत. यापैकी ५०० इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. उर्वरित कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील. अशीच यंत्रणा महाराष्ट्रातही शक्य आहे. त्यामुले पालकांना मोठा दिलासा मिळेल.
हे काम टेक्नोसॅस सिक्युरिटी लिमिटेड करीत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जानेवारी २०१९ मध्ये सुमारे १.५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते, त्या अंतर्गत चार मेगा पिक्सेल कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कशी असणार शाळा सीसीटीव्ही यंत्रणा?
• सरकारी शाळांमध्ये ३१ मार्चपर्यंत बसविण्यात येणार सीसीटीव्ही कॅमेरे
• सर्व सरकारी शाळांमध्ये ही यंत्रणा राबविली जाणार आहे.
• शाळांमध्ये वर्ग, कॉरिडॉर आणि सर्व मोकळ्या जागांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
• एका शाळेत सुमारे दोनशे कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
• प्रत्येक वर्गात कॅमेरे बसविण्याबरोबरच मुख्याध्यापकांच्या खोलीत एलईडी स्क्रीनसुद्धा लावण्यात आल्या आहेत.
• जर कोणी कॅमेर्याने छेडछाड केली किंवा त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तत्काळ शाळेचे मुख्याध्यापक आणि पीडब्ल्यूडीच्या संबंधित अभियंता यांच्या मोबाइलवर संदेश पाठविला जाईल.
• कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यासाठी आवश्यक ते सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले जातील.
पाहा व्हिडीओ: