मुक्तपीठ टीम
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांमधील वादावर सुनावणी करताना पक्षाचे ‘धनुष्य आणि बाण’ चिन्ह तात्पुरते गोठवले. तसेच फक्त शिवसेना हे नाव वापरण्यावरही तात्पुरती मनाई घातली. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झालेली असताना आलेला हा निर्णय महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवणारा ठरला आहे.
आता सोमवारपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांच्या गटांसाठी पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह नाव सुचवण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
शिवसेना ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात जाणार!
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर शिंदे गट आणि भाजपा सोडून सर्वच पक्षांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “ऐकल्याशिवाय, चौकशी न करता त्यांनी आमचे चिन्ह गोठवले आहे. देश हुकूमशाहीकडे जात आहे. ते उडवले जात आहेत. आम्ही या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत.”
शिंदे गट म्हणतो धनुष्यबाण आम्हालाच मिळणार!
शिवसेना वाचवण्यासाठी बंडाचा दावा करणाऱ्या शिंदे गटाचेही निवडणूक आयोगाचा नुकसान करणारा ठरला आहे. कारण आता त्यांच्या मुळ उद्देशालाच आयोगाचा निर्णय छेद देणारा ठरला आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की धनुष्यबाण चिन्ह गोठवणे हा तात्पुरता निर्णय आहे. तो बदलला जाईल, ते चिन्ह आम्हालाच मिळणार आहे.