मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. रेपो रेट वाढल्याने बँकांच्या कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. बँका ते ग्राहकांना देतील. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बॅंकेने देखील कर्जदरात ५० बेसिसने वाढ केली आहे. या वाढीमुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय स्टेट बॅंकेसह आणखी दोन बँकांनी व्याजदर वाढवले!
- रेपो दरात वाढ केल्यानंतर, खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसीने देखील कर्जदरात वाढ केली आहे.
- एचडीएफसी बँकेने व्याजदरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे.
- यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ईएमआय वाढेल.
- एचडीएफसी बँकेने पाच महिन्यांत सातव्यांदा यात वाढ केली आहे. त्याच वेळी, बँक ऑफ इंडियाने आरबीएलआर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
गृहकर्ज महागणार, कर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागणार…
- भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर भारतीय स्टेट बॅंकेने देखील व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे.
- विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वाढीनंतर बँकांसह आणखी अनेक वित्तीय संस्था व्याजदर वाढवू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चौथ्यांदा व्याजदर वाढवला होता. या वाढीनंतर रेपो रेट ५.९० टक्के झाला आहे. भारतीय स्टेट बॅंकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवरही ही माहिती दिली आहे. या वाढीनंतर स्टेट बँकेचा EBLR ८.५५ टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, RLLR ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.