मुक्तपीठ टीम
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे भारतात लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील एका न्यायालयाने, “नीरव मोदीने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे, येथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही कारण गुन्हा सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा नाही”, असा निर्णय दिला. यामुळे नीरव मोदींच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नीरव मोदींसाठी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात विशेष कोठडीची व्यवस्था करण्यात आल्याचे कळते.
नीरव मोदीला मुंबईमध्ये आणल्यानंतर बराक क्रमांक १२ मधील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. जेव्हा त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल तेव्हा कोठडी तयार असेल. त्या कोठडीला आवश्यक ती कडक सुरक्षाव्यवस्थाही असणार आहे.
नीरव मोदीसाठी विशेष कोठडी
- नीरव मोदीला ठेवल्या जाणाऱ्या कोठडीत कैद्यांची संख्या कमी असेल
- जेलमध्ये कॉटनची चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट असेल.
- तीन चौरस मीटरची जागा वापरण्यासाठी मिळेल
- याशिवाय कोठडीत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन असेल
- सामान ठेवण्यासाठी जागा असेल.
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी काय आश्वासन?
- “नीरव मोदीने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही”, असा निर्णय ब्रिटनमधील एका न्यायालयाने दिल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला.
- प्रकृतीबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जाईल, अशी हमी भारत सरकारने अनेकदा दिली आहे.
- प्रकृतीबाबत मानवाधिकाराचे उल्लंघन होण्यासारखे नाही, असेही न्यायाधीश सॅम्युएल गूझी यांनी सांगितले.
- त्यामुळे प्रत्यार्पणाविरोधातील न्यायालयीन लढाईत नीरव मोदींचा पराभव झाला आहे.
- नीरव मोदी लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगातून दूरचित्रसंवादाद्वारे न्यायालयीन सुनावणीत सहभागी झाला होता.