मुक्तपीठ टीम
येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्याआधी भाजपा महाराष्ट्रात अनेक लक्ष्य साध्य करण्याच्या तयारीत दिसत आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची ईडी कोठडी सातत्यानं वाढत असतानाच दाखल झालेलं आरोपपत्र त्यांना अधिकच गुंतवणारं दिसत आहे. एकीकडे संजय राऊतांचा कोठ़डीतील मुक्काम वाढवण्याची तजविज दिसत असतानाच दुसरीकडे ते ज्यांना बाळासाहेबांएवढेच मानतात त्या शरद पवारांनाही भाजपाने लक्ष्य करण्याचे ठरवल्याचं दिसत आहे. ईडीच्या आरोपपत्रात नावांचा थेट उल्लेख नसला तरी भाजपाचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या थेट चौकशीची मागणी केली आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात दाखल आरोपपत्रात ईडीने आणखीही अतिरिक्त माहिती दिली आहे. त्यामुळे त्यावरून राजकारण सुरु झाले आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, २००६-२००७ च्या दरम्यान पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या बैठकांना संजय राऊत होतेच पण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते. त्यांच्या नावाचा उल्लेख ईडीने आपल्या आरोपपत्रात केलेला नसला, तरी त्या कालखंडात शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते.
ईडीच्या पत्राचाळ आरोपपत्रात खळबळजनक दावे
- ईडीने आरोपपत्रातून खळबळनक माहिती दिली आहे.
- पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती.
- या बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आलं होतं.
- या सर्व घडामोडींची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे.
- त्यानंतर यामध्ये एक हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं आरोपत्रात म्हटलं आहे.
संजय राऊत हेच पत्रा चाळ घोटाळ्याचे मास्टरमाइंड
- संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा ईडीने केला आहे.
- प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते म्हणून त्यांना गुरु आशिष कंपनीत घेण्यात आले.
- गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा २५ टक्के हिस्सा होता.
- प्रवीण राऊत हे फक्त एक मुखवटा होते, प्रत्यक्षात ते सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली करत असत.
- प्रवीण राऊत यांच्याकडे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार होते.
- त्यांना म्हाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम होते.
- संजय राऊत यांचा संपर्क वापरत प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला, नंतर एफएसआय बिल्डरला विकला.
- याप्रकरणात राकेश वाधवान, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचं संगनमत होते.