मुक्तपीठ टीम
१७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित आज बीड शहरातील श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
या प्रभात फेरीचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, अहमदनगर येथील कार्यालयाने, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, बीड यांच्या सहकार्याने केले होते. या रॅलीचा प्रारंभ बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
या वेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यांनंतर निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या तिरंगा रॅलीस श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्याथी-विद्यार्थींनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साधारणत: २५०० विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात भारताचा कापडी राष्ट्रध्वज होता. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ व ‘विजय विश्व तिरंगा प्यारा’ या सारख्या राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी आपले विचार प्रकट केले. देशातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर स्वविकासातून राष्ट्राचे हित साधावे, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधकारी कुलकर्णी यांनी, मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची माहिती देताना लढ्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशाप्रती जाज्वल्य भावना जागृत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उप शिक्षणाधिकार मोहन काकडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी पी.कुमार, मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उपमुख्याध्यापक राजकुमार कदम, पर्यवेक्षक बी. डी. मातकर, प्राचार्य मुखेकर आदी उपस्थित होते.