मुक्तपीठ टीम
बाबा रामदेव यांनी चार पतंजली कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. बाबा रामदेव यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ज्या कंपन्यांचा आयपीओ जाहीर केला आहे त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली वेलनेस आणि पतंजली लाइफस्टाइल यांचा समावेश आहे.
पतंजली समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून पुढील पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अशी अपेक्षा पतंजली समूहाचे संस्थापक बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की चार समूह कंपन्यांचे आयपीओ आणले जातील. तसेच ते म्हणाले की, त्यांचा समूह येत्या काही वर्षांत पाच लाख लोकांना रोजगार देईल. पतंजली समूहाचा सध्याचा व्यवसाय सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा आहे.
पतंजलीची व्यवसायात उंच भरारी!
- बाबा रामदेव म्हणाले की समूह कंपनी पतंजली फूड्स (पूर्वीची रुची सोया) स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली आहे आणि पुढील पाच वर्षांत इतर चार कंपन्यांचे आयपीओ आणले जातील.
- पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेस या चार कंपन्या आहेत.
- समूहाची सर्व उत्पादने उच्च दर्जाची असून धार्मिक, राजकीय, औषधी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे माफिया त्यांच्या ब्रँडची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
- रामदेव म्हणाले की समूहाने १०० हून अधिक लोकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि एफआयआर देखील दाखल केला आहे. मात्र, त्यांनी त्या लोकांची आणि संघटनांची नावे उघड केली नाहीत.
पतंजली समूहाने या कंपन्यांना बाजारात सूचीबद्ध करण्याचे काम सुरू केले आहे. या ५ कंपन्यांकडून ५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य मिळविण्याची तयारी सुरू आहे.