योगेश केदार / व्हा अभिव्यक्त!
जगाच्या इतिहासात हैदराबाद हे असे एकमेव राज्य असेल ज्याच्या संस्थापकाने एकही लढाई जिंकली नव्हती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या दिल्लीतील दरबारी राजकारणात सर्वोच्च सत्तास्थानी ते परिस्थिती बिघडल्याचे बघून पळून येऊन दक्षिणेत असफजाह म्हणवून घेत एका राज्याची स्थापना करणारा तो निजामशाह. मराठ्यांच्या सोबत झालेल्या जवळपास सर्वच लढायांत चींकीलीच खानाचे उर्फ निजामाचे सैन्य हारले होते. नंतर फ्रेंच सैन्यासोबत व इंग्रज असतील की अन्य कुणासोबतही तो जिंकला नव्हता. तरीही सहा सात पिढ्या ते राज्य टिकले. ते कसे? याबाबत मी येत्या काही काळात विस्तृत लिहीन.
आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन. मराठवाड्यातील सामान्य जनतेने प्रचंड मोठे हाल सोसले. ४७ मध्ये देश स्वतंत्र झाला होता, पण नंतरही एक वर्षा पेक्षा जास्त काळ हैदराबाद पारतंत्र्यात होता. आज अखंड भारतात आपण आहोत म्हणून आपल्याला त्याचे काही अप्रूप वाटत नाही. फार फार तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलिस कारवाई केली आणि हैदराबाद जिंकून भारतात जोडून घेतले येवढेच माहिती असते. पण मराठवाडा आणि एकूणच संस्थानात सामान्य हिंदू जनतेवर प्रचंड मोठे अत्याचार झाले. रजाकार हिंदू धर्मातल्या दलीत असेल की कथित सवर्ण कोणालाही सोडत नव्हते. गावेच्या गावे जाळून टाकली जायची. माताभगिनिंवर, लहान मुलांवर प्रचंड अत्याचार झाले. त्याच्या पुढे जाऊन सांगतो जे काही मोजके मुसलमान हिंदूंना मदत करायचे त्यांना सुद्धा शिक्षा एकच होती मृत्युदंड.
या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी गावोगाव हिंदूंनी संघटित होऊन प्रतिकार केला. हजारो लोकांचा त्यात बळी गेला. सुरुवातीला आर्य समाजाच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी लढा एकत्रित केला. नंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. माझे आजोबा बाबू केदार हेही त्या लढ्यात सहभागी होते. काँग्रेसला बंदी असल्याने काँग्रेस च्या बॅनर खाली लोक तेवढे एकत्र होऊ शकले नाहीत. पण इतरत्र जी स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती, त्याचा चोहो बाजूंनी हैदराबाद च्या स्वातंत्र्य लढ्याला फायदा झाला. बाहेरून लोक लागेल ती मदत पोचवायचे. तरुणांची मोठी फळी शशस्त्र लढ्यात उतरली होती. ज्यावेळी भारतीय सैन्य हैदराबाद घेण्यासाठी घुसले तेंव्हा स्थानिकांनी भारतीय सैन्याचे जिकडे तिकडे स्वागत केले. काही ठिकाणी तर आमच्याकडचे तरुण रणगाड्यावर बसून रस्ता दाखवायला सुद्धा पुढे होते अश्या नोंदी सापडतात. लोकांनी पुढाकार घेतल्यानेच हैदराबादचा लवकर पाडाव झाला. मी भारतीय सेनेच्या आणि आमच्या पूर्वजांच्या प्रचंड त्यागामुळे आम्ही आज भारतात आहोत हेही तितकेच खरे. युद्धस्य कथा रम्याहा म्हणतात ते खरेच आहे.
असो, 48 मध्ये आम्ही स्वतंत्र भारतात आलो. भाषावार पुनर्रचनेत बिनशर्त संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झालो. परंतु ज्या प्रमाणात दोन्ही सरकार ने म्हणजेच राज्य आणि केंद्र सरकार ने लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले नाही. पूर्वी शेकडो वर्षे निजामाने शोषण केले. नंतर आपल्याच सरकारने सुद्धा दुर्लक्ष केल्याने आम्ही विकासाच्या शर्यतीत मागेच आहोत.
आमच्याच भागात शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त आहेत. मराठा आरक्षणा साठी सर्वात जास्त बलिदान मराठवाड्यातील तरुणांनी दिले. कारण अखंड शोषणाची आणि त्यातून तयार झालेल्या पराभूत मानसिकतेची ती परिणती असावी. आक्रोशाची धग या मातीत इतकी आहे की ती येत्या काळात सर्वांसाठी पोळणारी असेल. म्हणून राज्य कर्त्यानी वेळीच सकारात्मक भूमिका घेत आमच्या आशा अकांक्षांचा विचार करावा. पाणी ते आरक्षण या आमच्या मूलभूत गोष्टी आम्हाला द्याव्यात ही अपेक्षा.
येत्या १९ तारखेला मराठ्यांचा ५०% च्या आतल्या आरक्षणासाठी महामोर्चा निघेल. लाखोंचा जनसागर कळंब येथे उसळेल. आजही आम्ही शांततेच्या मार्गाने संविधाना च्या चौकटीत राहून आरक्षण मागतोय. राजकारणाच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्रातील सर्वच गरीब मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावे व सर्व जातींना व्यवस्थेचा लाभ देऊन समता प्रस्थापित करावी ही सरकार कडे प्रार्थना.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी आज च्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने अखंड झाला असे म्हणता येईल. आमचा खरा स्वातंत्र्य दिन आणि हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त काही शब्द. सर्वांना हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
योगेश केदार
9823620666