मुक्तपीठ टीम
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याच्या आमिषाखाली एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप मुंबईतील मनसे नेते वृतांश वडके यांच्यावर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान विविध आमीष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणुक केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यानंतर याप्रकरणी वडके यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. आरोपी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागप्रमुख आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवून देतो, असे म्हणत गैरफायदा घेतल्याचं एका महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वडकेंवर बलात्कारासोबतच धमकावल्याचाही आरोप आहे.
तक्रारीत महिलेने काय म्हटले आहे?
- एका ४२ वर्षीय महिलेने वडके यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
- आरोपीने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केला असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
- येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केला आहे.
- महिला पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६, ५०० आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.