मुक्तपीठ टीम
दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याच बैठकीत अजित पवार भाषण टाळत मंचावरून गायब झाल्याने राष्ट्रीय माध्यमांमध्ये वेगळ्याच चर्चांना रंगत आहेत. शिवसेनेमागोमाग आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडत असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक होती.
- त्या बैठकीत भाषणासाठी जयंत पाटलांचं नाव पुकारलं जाताच अजित पवार मंचावरून निघून गेले.
- खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनंतर अजित पवारांचं भाषण होतं, असं नंतर सांगण्यात आलं.
- त्यानंतर मंचावरून ते स्वच्छतागृहात गेल्याचे सांगण्यात आले आणि मग प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या भाषणाची घोषणा केली, पण आले नाहीत.
- अजित पवार परतले ते शरद पवारांचं कार्यकारिणी बैठकीचा समारोप करणारे अखेरचे भाषण सुरु झाल्यानंतरच…
अजित पवारांचं गायब होणं माध्यमांमध्ये फुटीच्या चर्चा रंगवणारं…
- राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांनी आक्रमक भाषण केलं.
- त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही, अशी भाषा वापरत भाजपाविरोधात आक्रमकतेचे संकेत दिले.
- त्यासाठी शरद पवार विरोधी एकजुटीच्या प्रयत्नात असल्याची चर्चाही आहे.
- मात्र, एकीकडे शरद पवार राष्ट्रीय राजकारणात महाविकास आघाडी प्रयोगाच्या तयारीत असतानाच त्यांच्याच पक्षात, त्यांच्याच पुतण्याची नाराजी जगजाहीर झाल्याने पहिल्याच घासाला खडा लागला आहे.
- अजित पवार मंचावरून उठल्यावर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
- अजित पवारांच्या या भूमिकेकडे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.