मुक्तपीठ टीम
दिल्लीतील राजपथचे नामकरण आता कर्तव्य पथ करण्यात येणार आहे. या निर्णयाचे कौतुक जसं होत आहे तसा विरोधही होत आहे. काँग्रेसने थेट विरोध केला आहे. राजपथच्या नवीन नावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. पण काँग्रेसमध्येच या मुद्द्यावरून परस्परविरोधी विधाने समोर आली आहेत. मुंबईतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी राजपथला कर्तव्य पथ म्हणून नाव देण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. त्यामुळे त्यांचं नेमकं काय चाललंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजपथ नामांतरला काँग्रेसचा विरोध
- याआधी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी राजपथला कर्तव्य पथ असे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध करताना मोदींना टोला लगावला होता.
- पवन खेरा यांनी ट्विट केले होते की, “राजपथचे नाव बदलायचे असते तर ‘राजधर्म’ने मार्ग बदलला असता. अटलजींच्या आत्म्याला शांती लाभो. २००२ मध्ये जेव्हा गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गुजरातला गेले होते.
- तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, सीएम मोदी यांनी राजधर्माचा मार्ग अवलंबावा अशी माझी इच्छा आहे.
त्याच विधानाच्या आधारे काँग्रेसच्या वतीने ही टीका करण्यात आली.
मिलिंद देवरांकडून मात्र समर्थन!
देवरा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराकडे म्हणजेच संसदेकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव योग्य आहे. याबरोबरच सनदी कर्मचाऱ्यांनी धर्मात रमून जनतेच्या सेवेसाठी कार्य करावे हे सदैव लक्षात राहील.”