मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी एकीकडे भाजपासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती केली असून यापुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवेल, उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो.
- केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे.
- यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत.
- कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल.
- आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत.
- प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात.
- संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.
दुहीच्या शापाला गाडून टाकू!!
- मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे.
- आपली भूमिका रोखठोक आहे.
- ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत.
- आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे.
- काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात.
- ही आपली वैचारिक युती झाली आहे.
- महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही.
- शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत.
- आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे.
- आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू.
- संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे.
- दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु.
- या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल.
- संविधान टिकवण्यासाठी ही युती झाली आहे.
क्रांतीची गरज आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो- मनोज आखरे
- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, एक चांगलं समीकरण शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं तयार होणार आहे.
- संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून राज्यात काम करत आहे. राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे.
- व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सत्तेत येणं गरजेचं आहे.
- त्यामुळं आम्ही २०१६ रोजी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला.
- आम्ही विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका लढवणार आहोत, त्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं एकत्र यायचं ठरवलं आहे.
- देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे.
- देशात विषमतावादी वातावरण झालं आहे.
- आज क्रांतीची गरज आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो आहोत.