मुक्तपीठ टीम
भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर भाजपा प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे आणि भाजप नेते आशिष शेलार यांचना मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आली आहे.
कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?
- चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपद सांभाळले आहे.
- डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.
- तरीही पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना २०१९च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली.
- त्यांचा भाजपाला निवडणुकीत फटकाही बसला. त्यामुळे त्यांना ओबीसी नेता म्हणून सक्रिय करण्यात आले.
- त्यानंतर काही महिन्यांपूर्वी नागपूर विधानपरिषदेवर बावनकुळेंना स्थान देण्यात आलं.
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या रुपाने मराठा नेता, उपमुख्यमंत्रीपदी ब्राह्मण नेता असल्याने ओबीसी मतांसाठी भाजपाने सामाजिक समीकरण साधण्यासाठी ओबीसी नेते असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंची अध्यक्षपदी निवड केली असावी.
आशिष शेलारांना का देण्यात आली ही जबाबदारी?
- आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष होते.
- त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाने २०१७च्या निवडणुकीत दुपटीपेक्षा जास्त जागांवर झेप घेतली होती. भाजपाने स्वबळावर ८०चा आकडा ओलांडला होता.
- आगामी मुंबई महापालिकेची निवडणुकीचं महत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे पुन्हा सोपवण्यात आली आहे.
- तसेच आशिर शेलार हे कोकणातील आहेत, मराठा आहेत, त्याचा फायदा मुंबईतील मराठी मतदारांमध्ये असलेले शिवसेनेचे प्रभूत्व कमी करण्यासाठी होऊ शकेल.
- मुंबईतील मराठी मतदारांमध्ये कोकणी मतदारांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे.
बावनकुळे, शेलारांचं मंत्रीपद का नाही ते झालं स्पष्ट!
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मराठा नेते आशिष शेलार यांचा समावेश का नाही, अशी चर्चा रंगली होती.
- पण आता त्यामागील कारण स्पष्ट झालं आहे.
- एकाच व्यक्तीकडे मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद देण्याचे धोरण भाजपात नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदासाठी निवडण्यात आले नाही.