मुक्तपीठ टीम
मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सदिच्छा भेट दिली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष एस एस मुंद्रा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी – सेट भेट दिला. औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेह भोजन आयोजित केले.
यावेळी मालदीवचे वित्त मंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल व परराष्ट्र सचिव अहमद लतीफ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाच्या संचालका राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व पोलीस महासंचालक रजनीश सेठ प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड मेंबर्स समवेत राष्ट्राध्यक्ष श्री सोलिह यांनी चहापान घेतल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थित नेटवर्क ऑपरेशन सेंटर (NOC)आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची (SOC) पाहणी केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन हॉलमध्ये येऊन प्रातिनिधिक स्वरुपात घंटा वाजविली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बोर्डच्यावतीने ‘द बिग बुल’ या कांस्य शिल्पाचे स्मृतिचिन्ह आणि ‘बी एस ई- टेंपल ऑफ वेल्थ क्रिएशन’ हे कॉफी टेबल बुक श्री.सोलीह यांना भेट देण्यात आले.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हे भारतातील पहिले आणि सर्वात मोठे सिक्युरिटीज मार्केट आहे आणि 1875 मध्ये नेटीव्ह शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स असोशिएशन म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. आज जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजपैकी एक म्हणून त्याची गणना होते. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष श्री. सोलिह आले होते, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष श्री. मुंद्रा यांनी दिली.