मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात अनेक मुद्द्यांवर रोखठोक मतं मांडलीत. भाजपाच्या देशाला विरोधकमुक्त करण्याच्या धोरणावर त्यांनी स्पष्ट शब्दात मत मांडलं आहे. ते म्हणालेत, “सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते.”
सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेतील ४० आमदार १२ खासदार, नगरसेवकही आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवरील आक्रमकता, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, महाविकास आघाडी, भाजपा आणि वर्षा बंगला सोडतानाचा अनुभवावर भाष्य केलं.
उद्धव ठाकरे मुलाखतीत काय बोलले?
- बरं! झालो मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे.
- काय प्रॉब्लेम काय तुम्हाला?
- म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले?
- का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको.
- ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा.
- भाजपा किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- ती क्लिप फिरतेय.
- भाजपा कसा शिवसैनिकांवर अन्याय अत्याचार करतो ही ती क्लिप आहे.
- माझ्याचसमोर त्यांनी तो राजीनामा दिला होता.
- प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो.
- उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील व पंतप्रधानपदावर दावा सांगतील.
- भाजपवाल्यांनो, सावधान!
या देशात लोकशाही राहील की नाही, असा प्रश्न आपल्यालाही पडलाय का?
- देशातील आताची परिस्थिती अगदी तशीच आहे.
- मात्र विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल.
- लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल.
- शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात.
- जय-पराजय सगळ्यांचेच होत असतात.
- नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात.
- हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे.
मग भीती कसली त्यात?
- पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते.
- मीही मुख्यमंत्री होतो.
- आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय.
- काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते.
- माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही.
- अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, ‘सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.’
- देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत.
- कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत.
- सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय.
- बेरोजगारी आहे.
- अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही.
- थातूरमातूर मलमपट्टी केली जाते.
‘अग्निवीर’ आणलीय ना…
- हो, पण त्यातूनसुद्धा वीर बाहेर पडले ना!
- त्यांच्या डोक्यात ‘अग्नी’. म्हणूनच ते ‘वीर’ बाहेर पडले.
- रस्त्यावर उतरले.
- त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला तुम्ही टेंपररी बेसिसवर ठेवताय.
- आमचा तरुण रस्त्यावर उतरला आहे.
- आयुष्य, संसार हा कायमचा असतो.
- टेंपररी बेसवर आम्हाला रोजगार देणार असाल तर पुढे काय होणार, असा त्यांचा प्रश्न आहे.
कंत्राटी सैनिक ही कल्पना तुम्हाला कशी वाटते?
- तुम्हाला कंत्राटी पद्धत हवी ना, मग करायचेच आहे तर सगळीकडेच कंत्राटी पद्धत करा.
- राज्यकर्ते पण कंत्राटी आणा.
- सगळ्यासाठीच आपण मग एक एजन्सी नेमू आणि ठेवू कामाला.
- या देशापुढील कोणते प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने सतावतात? लोकशाही संकटात आहे, न्यायालयांवर दबाव आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय…
- आधी अटक, मग आरोप ठरवतील आणि कालांतराने त्यानं ते सुटतात.
- तोपर्यंत तुम्ही त्यांचे आयुष्य बरबाद केलेले असतं.
- मात्र कुणाचे आयुष्य बरबाद करून कोणाला सुख लाभत असेल असे मला वाटत नाही.
- अशी लोकं कधी सुखात राहू शकतील आणि शकतात यावर माझा विश्वास नाहीय.
- त्याच्यामुळे ठीक आहे… लोकशाही आहे.
- तुम्ही काय बोलायचे तेही ठीक आहे.
- पण आता जे काही बदनामीकरण चाललेय ते घाणेरडया, अभाध्य आणि विकृत पद्धतीने चालले आहे.
- हे कुणाला ‘लाभणारं नाहीय!
विरोधकांना नामोहरम करायचे, अटकेची भीती दाखवायची असं का होतं?
- कारण तुमच्या लक्षात असेल की, नितीन गडकरी बोलले होतेच की, आमच्याकडे ‘वॉशिंग मशीन आहे.
- लोकांना घेऊन आम्ही ‘पुण्यवान’ करतो.
- त्यांच्याकडे जे लोक काही आरोपांमुळे गेलेत, त्यांचे पुढे काय झाले ते पण पाहावे लागेल.
- सध्या नवीन नवीन लोकांना त्रास दिला जातोय.
- हे सशक्त राज्यकर्त्यांचे लक्षण नाही… ही भीती आहे…
- शिवसेनेतीस गेलेले ते पवित्र झाले असतील. तुमच्यावरही असे आरोप सुरू आहेत.
- तुम्हालासुद्धा ते अटक करणार असं वातावरण तयार केलं जातेय.
- फक्त यंत्रणांचा गैरवापर दुसरे काय?
आपण धर्मात्मे आहोत…
- याला काय म्हणायचं? पण तुम्ही हटत नाही. तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही पण पुण्यवान व्हाल!
- होय, मला तसं सांगण्यातच आलं होतं, पण अशाप्रकारे मला पुण्यवान व्हायचं नाही…
- सगळे पुण्यात्मे तिकडे जातील.
- आपण धर्मात्मे आहोत…
- म्हणूनच बाळासाहेब म्हणायचे की, कमनि मरणाऱ्याला धमनि मारू नका.
- शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो.
या दडपशाहीविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांनी काय केले पाहिजे?
- पहिली म्हणजे सर्वाना इच्छा असली पाहिजे.
- आणीबाणीच्या काळात लोकांनी तो अनुभव घेतला.
- जनता पक्ष स्थापन झाला होता.
- तुम्ही म्हणता ना, जनता काय करते?
- तर, त्यावेळी आपण लहान होतो.
- ७५-७७ च्या काळातली गोष्ट.
- जनता पक्षाकडे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट पण नव्हते.
- तरीसुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली.
- सर्व स्तरांतील लोपं, मग साहित्यिक असतील, विचारवंत असतील, त्यांनी बाहेर पडून आवाज उठवला होता.
- जनता पक्ष सत्तेवर आला.
- मात्र नंतर आपापसात भांडून स्वतःचे सरकार स्वतःच पाडून टाकले.
- त्याच्यामुळे एक इच्छाशक्ती पाहिजे.
- की समजा, जर एकत्र यायचं झालं तर कोणीही पदावरून भांडणार नाही.
- आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली असे मी म्हणणार नाही.
- पण ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता अनेक जणांचं मत आहे की, ही पावलं, ही लक्षणं काही बरी नाहीयत.
- चुकीच्या दिशेने पडताहेत, असेच अनेकांचे मत आहे.
- आपण जी इच्छाशक्ती म्हणताय, तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून, प्रमुख विरोधी पक्षाचे नेते म्हणून ही इच्छाशक्ती तुमच्याकडे आज आहे का?
- हो, नक्कीच आहे.
- पण प्रश्न एकट्याचा नाहीय.
- यासाठी देशातील सर्व राज्यांनी एकत्र यायला हवे.
- एकदा लढा उभा राहिला की देश जागा होईल.
- माझं तर म्हणणं आहे की, भारतीय जनता पक्षानेसुद्धा अधिक शत्रू न वाढवता ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो….
…हेल्दी ?
- होय. ‘हेल्दी पॉलिटिक्स’ करावं.
- आम्ही तर मित्रच होतो.
- २५-३० वर्षे आपण त्यांचे सोबतीच होतो.
- तरीसुद्धा त्यांनी २०१४ ला युती तोडली.
- कारण काहीही नव्हतं.
- तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही.
- तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेशी युती शेवटच्या क्षणाला तोडली होती.
- त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो त्यांचे २०१९ ला.
- काय मागत होतो?
- मी अडीच वर्षासाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रीपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं.
- ते मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी नव्हतं.
- अडीच वर्षे मुख्यमंत्री पद का मागितले होते?
- तर मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
- मात्र तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणावे लागेल.
- कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो.
- मुख्यमंत्री पद मला एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागले.
- कारण सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या.
- म्हणून मला ते करावं लागलं.
हो, पण फुटिरांचा तोच आक्षेप आहे! फुटिरांचा आक्षेप हाच आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले…..
बरं! झालो मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, कॉंग्रेस राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा.