मुक्तपीठ टीम
भारतीयांचे स्विस बँकेतील पैशांसंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे २०२१ च्या अखेरीस स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये ८.३ टक्क्यांनी घट झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय काळा पैसा कर कायद्यांतर्गत परदेशात अघोषित संपत्ती जमा करण्याच्या ३६८ प्रकरणांमध्ये १४ हजार ८२० कोटी रुपयांचे कर दायित्व उघड झाले आहे. सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच त्या म्हणाल्या की २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये परदेशात दडवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याच्या कथित मीडिया रिपोर्ट्स प्रत्यक्षात दिशाभूल करणारे आहेत.
निर्मला सीतारणम म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांसह अनेक लोकांमध्ये सामान्य समज असा आहे की, स्वित्झर्लंड आणि परदेशात जमा असलेली सर्व भारतीयांची संपत्ती काळा पैसा (अघोषित) आहे. मात्र, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या स्थानिक बँकिंग आकडेवारीच्या आधारे प्रसारमाध्यमे काळा पैसा वाढल्याचा दावा करत आहेत, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांच्या ठेवींमध्ये घट झाली आहे.
१४ हजार ८२० कोटी कर वसुलीची प्रक्रिया सुरू झाली!!
- अर्थमंत्र्यांनी सांगितले की, परदेशात दडवलेला अघोषित पैसा परत आणण्याचा प्रश्न आहे, या संदर्भात तयार करण्यात आलेल्या काळा पैसा कायदा, २०१५ अंतर्गत एकूण ६४८ प्रकरणांमध्ये ४ हजार १६४ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे.
- त्यापैकी ३६८ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून त्यांच्याकडून १४ हजार ८२० कोटी रुपयांची कराची मागणी करण्यात आली आहे.
- ही रक्कम दंड आणि व्याजासह आहे.
- आतापर्यंत २ हजार ४७६ कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल झाला आहे.