मुक्तपीठ टीम
कोरोनाचं संकट जगाला हादरवून गेले. नेहमीची कामे थंडावल्याने वेळेचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. काहींनी त्या वेळेचा सदुपयोग करीत वेगळे काही तरी करु दाखवले. मुंबईतील काही तरुण असेच पुढे सरसावले. त्यांनी मुंबईच्या अंधेरी उपनगरातील एक शाळा सुंदर चित्रांनी सजवली. वेरावली मनपा शाळेतील रिकाम्या भिंती तरुणांनी रंगवलेल्या चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. एका वर्षानंतर शाळेत परतणार्या मुलांसाठी ९५ हून अधिक तरुण स्वयंसेवकांनी शाळा मस्त रंगवली,
या सर्वांना ‘कनेक्ट फॉर वॉलेन्टिअर’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने एकत्र आणले. ‘पेन्ट अ स्कूल’ या उपक्रमाचा उद्देश शाळेच्या इमारतीचा उपयोग लॉकडाऊनच्या एका वर्षानंतर शाळेत परत येणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्साहपूर्ण वातावरणाच्या निर्मितीचा होता.
शाळेतल्या मुलांसाठी हा उपक्रम राबविला गेला आहे. मुले शाळेत पुन्हा परततील, तेव्हा त्यांना काहीतरी वेगळे दिसावे असा उपक्रमागे हेतू होता. रंगीबेरंगी आणि माहितीपूर्ण चित्रांनी सजलेल्या भिंती पाहून मुलांनाही आनंदच झाला. स्वयंसेवक अपूर्वा सावंतने सांगितले की, “आम्ही जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील वेरावली मनपा शाळा रंगविली. मला आशा आहे की मुलांनाही ते नक्कीच आवडत आहे.” पेंट-अ-स्कूल मोहिमेत अपूर्वासह आकांशा खेतान, दिशा थिरानी, युविका अग्रवाल, रितिक भंडारी, रिषी शेली आणि इतरांचा समावेश होता.
“आम्ही ९५ हून अधिक स्वयंसेवक होतो. वर्ग, कॉरिडॉर आणि शाळेच्या भिंतींवर चित्रे रंगवलीत. या उपक्रमाची कल्पना मजेदार आणि शैक्षणिक होती. भिंतींवर काही व्यंगचित्रं पात्र, अक्षरे, आकार, विविध भावना, सूत्रे, गणिताच्या सारण्या इत्यादी रंगविल्या गेल्या” असं इतर स्वयंसेवक तरुणांनी आनंदाने सांगितले.
पाहा व्हिडीओ: