मुक्तपीठ टीम
भारतासाठी माल घेऊन जाणारी पहिली रशियन ट्रेन इराणला पोहोचली आहे. ही ट्रेन प्रथमच आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर वापरून कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान मार्गे इराणला पोहोचली आहे. ट्रेनने आतापर्यंत ३ हजार ८०० किमी अंतर पार केले आहे. मालवाहतूक करणारे ३९ कंटेनर आहेत, जे भारतात आणायचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कमेनिस्तानच्या सीमेवर असलेल्या देशाच्या सरखास रेल्वे स्थानकावर १३ जुलै २०२२ रोजी ही ट्रेन पोहोचली आहे. इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हा ७,२०० किमी लांबीचा मल्टी-मोड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे. याद्वारे इराण, भारत, आर्मेनिया, अफगाणिस्तान, अझरबैजान, रशिया, युरोप आणि मध्य आशियामध्ये मालाची वाहतूक शक्य होणार आहे.
रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून रशियातून भारतात माल होणार आयात
- या प्रकल्पाला भारताचा पाठिंबा आहे.
- इराणच्या सरखास रेल्वे स्थानकावर येणारी एक रशियन ट्रेन मालवाहू कंटेनर बंदर अब्बास बंदरापर्यंत पोहोचवेल, जे स्टेशनपासून १ हजार ६०० किमी अंतरावर आहे.
- तिथपर्यंत रेल्वे मार्ग असून त्यानंतर हे कंटेनर सागरी जहाजात भरून भारतात पाठवले जातील.
- रशियातून भारतात माल घेऊन जाणाऱ्या या ट्रेनच्या स्वागतासाठी इराणमध्येही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- यामध्ये परिवहन मंत्री, उद्योग मंत्री, तेल मंत्री आणि स्वतः उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर हे देखील उपस्थित होते.
उपराष्ट्रपती मोखबर या कार्यक्रमात म्हणाले की, इराण आपल्या शेजारी देशांसोबत व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी तयार आहे. भारताकडे माल घेऊन जाणारी ट्रेन ६ जुलै रोजी रशियाच्या चेखोव्ह स्टेशनवरून निघाली होती आणि कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान मार्गे एकूण ३ हजार ८०० किमी प्रवास करून इराणला पोहोचली होती. भारत आणि रशियादरम्यान ही बिझनेस ट्रेन अशा वेळी प्रवास करत आहे जेव्हा युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पाश्चिमात्य जगाच्या विरोधानंतरही दोन्ही देशांमधील संबंध किती वेगाने पुढे जात आहेत, हे यावरून स्पष्ट होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील आठवड्यात इराणला जाणार आहेत. यादरम्यान ते परिसरातील कनेक्टिव्हिटीबाबतही बोलतील.
पाहा व्हिडिओ: