मुक्तपीठ टीम
पालघरमधील तीन ठिकाणी थाटात सुरु असलेल्या लग्न समारंभांवर रविवारी अचानक धाड घालण्यात आली. सरकारी पथकाची धाड अचानक पडल्याने आयोजकांना सुरुवातीला लक्षातही आले नाही. अधिकाऱ्यांनी खडसावले तेव्हा लक्षात आले की कोरोना नियमांची पायमल्ली करत जास्त गर्दी, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले गेलेले नसल्याने धाड पडली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन आता सक्रिय झाले आहे. कोरोना नियम न पाळणाऱ्या तीन लग्न समारंभांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. दुर्लक्ष केल्यामुळे सातपाटी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाबाबतचे नियम कठोर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, प्रांत तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात केली आहे. मंगल कार्यालय, रिसॉर्ट, लग्न समारंभाच्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. पालघरमधील शिरगावमधील जलदेवी रिसॉर्टवर पहिली धाड टाकली असून येथे सुरू असलेल्या लग्न समारंभावर कारवाई केली आहे. सातपाटी ,बिरवाडी या तीन ठिकाणी लग्न समारंभावर कारवाई करत नवरदेव, त्यांचे वडील, डीजे, कॅटरर यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सातपाटी पोलीस पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.