जयंत माईणकर
गुवाहाटीत जे ४० लोक आहेत ती जिवंत प्रेते आहेत, मुडदे आहेत. त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. त्यांचे आत्मे मेलेले असतील. ४० लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील. या ४० आमदारांच्या बॉड्या इथे येतील. त्यांना डायरेक्ट शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी. हे जिथे थांबले त्या गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागरूक मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठविले आहेत, द्या बळी. ही भडकावू भाषा आहे शिवसेनेचे खासदार सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची. याच भडकावू भाषेमुळे शिवसैनिक पेटून उठण्याची जास्त शक्यता आहे. ही भाषा समोपचाराची नाही. बोलून प्रश्न सोडवण्याची नाही. तर हिंसेने आपल्याला सलणाऱ्या व्यक्तीला दूर करण्याची असून या भाषेचा निषेध केला पाहिजे.
एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांच्या साथीने प्रथम सुरत नंतर गुवाहाटीला केलेलं पलायन हे राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या क्रियाशील पाठिंब्याशिवाय शक्य नाही. आपल्या मनाविरुद्ध घटना घडल्या नंतर सनदशीर , कायदेशीर मार्गाने त्याचा निषेध करण्याऐवजी हिंसक मार्गाने त्यात खोडा घालायचा आणि आपल्याला हवं ते प्राप्त करण्याचा
प्रयत्न करायचा. आणि अशा हिंसक कृत्यांच्या मागे नेहमीच असते भडकाऊ भाषा. हिंसक घटना जितक्या निषेधार्ह त्याहून जास्त अशा प्रकारची भडकाऊ भाषणं निषेधार्ह ! अशा भडकाऊ भाषणांनी सळसळत्या रक्ताच्या तरुणांची मने पेटवली जातात. मला १२ मार्च १९९३ साली घडलेल्या बॉम्ब ब्लास्टनंतर बिल्ट्झ या प्रसिद्ध इंग्रजी साप्ताहिकाची हेडलाईन आठवते Blast the brain crush the hand’ . (मुंबई बॉम्ब स्फोटाच्या मागे असलेला मेंदू आणि हात ठेचून काढा).कुठल्याही अतिरेकी कृत्याच्या मागे पद्धतशीरपणे ‘brain washing’ करणारे भावनिक शब्द असतात. भावनेला हात घालण्यासाठी देव, धर्म, जात, पंथ या अमूर्त कल्पनांचा वापर केला जातो . या भडकाऊ शब्दांवर, भाषणावर कारवाई केली पाहिजे. कारण ही भाषण प्रत्यक्ष कृतीहून जास्त हिंसक असतात.
अनेक वेळा जिवंत व्यक्तींना आपल्या मार्गातून कायमच हटविण्यासाठीसूद्धा या शब्दांचा वापर केला जातो. कारण दिलं जात या जिवंत व्यक्तींच्या अस्तित्वामुळे त्यांच्या नेत्यांच्या वाटचालीत आणि त्यांच्या विचारप्रणालीला अडथळे निर्माण होतात. हिंसेद्वारे आपल्या विचारप्रणालीला विरोध करणाऱ्या व्यक्तींना दूर करणं हे अतिरेकी डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांचं आद्य कर्तव्य. त्यासाठी हिंसा करणं म्हणजे तथाकथित शुद्धीकरणाची एक प्रक्रिया असल्याचं उजव्या विचारसरणी कडून सांगितल जात. तर डाव्यांची हिंसा ही त्याच प्रकारची असली तरीही गरिबांच्या उद्धारासाठी श्रीमंतांच्या विरोधात असल्याचा आव आणला जातो. स्वतंत्र भारतातील या अतिरेकी विचारांनी भारून केलेलं पाहिलं अतिरेकी कृत्य म्हणजे नथुराम गोडसेनी केलेला महात्मा गांधींचा खून म्हटला पाहिजे. ज्याचे परिणाम देशभर उमटले. इंदिरा गांधी, राजीव गांधींची हत्या हे ही अतिरेकी विचारांनी भारलेल्या तरुणांकडून करवून घेतलेल अतिरेकी कृत्य! सहा डिसेंबर १९९२ ला बाबरी मस्जिद पाडून ४६४ वर्षांपूर्वी घडलेल्या तथाकथित घटनेचा बदला घेण हेही कृत्य अशाच शब्दांनी भारलेल्या समुहाच!
महात्मा गांधी हे मुस्लिम धार्जिणे असून ५५कोटी रुपये पाकिस्तानला देणं ही चूक आहे या विचारांनी नथुराम गोडसे आणि त्याचे सहकारी भारलेले होते. आणि जर सांगोपांग विचार केला तर गांधीना मुस्लिम धार्जिणे म्हणणं कसं चूक होत आणि ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देणं आवश्यक होत हे लक्षात येईल.पण अतिरेकी हिंदुत्ववादी विचारांनी भारलेल्या लोकांना कोण
सांगणार?राष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटविणाऱ्या घटनांप्रमाणेच राज्य स्तरावर अशा प्रकारच्या घटना घडत असतात ज्याचे परिणाम कित्येक दशकं जाणवतात.
अशाच घटनेतील महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी घटा म्हणजे कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांचा खून शिवसेना आणि कम्युनिस्टांच्या संघर्षातला पहिला खून हा कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा.पण अशाच प्रकरणानी एक प्रकारची दहशत निर्माण होते. काहीशी अशाच प्रकारची दहशत स्व आनंद दिघेंच्या नावाने ठाणे शहरात नव्वद च्या दशकात तयार झाली होती. ‘ तुमचा श्रीधर खोपकर होऊ शकतो ‘ अस सहजगत्या म्हटल जात असे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाने तथाकथित रित्या क्रॉस व्होटिंग केलं आणि त्यामुळे काँग्रेसचा महापौर निवडून आला. त्यावेळी आनंद दिघेनी गद्दाराना शासन मिळेल असे उद्गार काढले. आणि काही दिवसातच शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या खोपकरांचा खून झाला. पुढे याच दिघेना लोक धर्मवीर म्हणू लागले. शब्दांचा परिणाम कृतीत झाला होता अस म्हटल जात. हिंसेला चिथावणी देणाऱ्या भाषेतून हिंसेचा जन्म झाला होता.अनेक वेळा विविध पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना सूचक भाषेत भडकावतात.’ माझ्यावर अन्याय होत आहे. मी शांत आहे. पण माझे कार्यकर्ते शांत राहतील याची खात्री नाही ‘, अस जेव्हा कुठल्याही पक्षाचा नेता म्हणातो तेव्हा तो एक प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहून नका हा संदेश देत असतो. आणि अशा संदेशांना हिंसेला प्रवृत्त करणारा संदेश समजून संदेश देणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. कारण अशाच प्रकारच्या हिंसेला भडकावणाऱ्या शब्दांनी हिंसा भडकते.
पत्रकार आणि कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत यांचं वर उल्लेखिलेले विधान हे त्याचं धर्तीच आहे.आणि ते चुकही आहे. ४० शव येतील किंवा कामाख्या मंदिरात ४० रेड्यांचे बळी द्या अस म्हणणं संपूर्णपणे अयोग्य आहे. अर्थात पक्षाचे प्रवक्ता पक्षप्रमुखाचा आशीर्वाद असल्याशिवाय अशी विधाने करू शकत नाही.भलेही आपल्यावर अन्याय झालेला असेल, तरीही हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या अशा विधानांपासून दूर राहणं सयुक्तिक! जेवढी गांधीहत्या निषेधार्ह आहे तितकीच ४० शव यासारखी विधान सुद्धा निषेधार्ह आहे!तूर्तास इतकेच!
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषणासाठी ओळखसे जातात.)