हेरंबकुलकर्णी / व्हा अभिव्यक्त!
मी गुवाहाटीत जाऊन त्यांना विचारलं
आसामात पुराने घरे बुडालीत ना ?
ते म्हणाले
आमचं हाटील एकदम ओक्के हाय
मी विचारलं
पुरात आतापर्यंत किती लोक मेले ?संख्या सांगा
ते म्हणाले…
कालचे धरून आता ४२ आमदार झालेत
पुरात विस्थापित झालेले लोक काय खात असतील ?
ते म्हणाले ,काहीच अडचण नाय.हाटीलात जे मागू ते मिळतेय…
मी विचारले आसाम आणि ईशान्य भारतात घुसखोरी चा प्रश्न कितपत गंभीर आहे ?
ते म्हणाले,आमच्यात कोणीच घुसखोर नाही सगळे निष्ठावंत आहेत
बोलण्यात काही अर्थ नव्हता….
म्हणून मी मुंबईत इकडच्या बाजूला आलो
यांना विचारलं….
पावसाने ओढ दिलीय…कसं होणार ?
ते म्हणाले ढग कितीही दूर गेले तरी येतील पुन्हा आमदारांसारखे …
मी विचारलं स्थलांतरित मजुरांसाठी शासन काहीच करत नाही
ते म्हणाले ” स्थलांतर केलेले आमदार आधी येऊ द्या परत,मग बघू ”
मी म्हणालो ” महागाई खूपच वाढली आहे ”
ते म्हणाले ” सरकार अस्थिर झाल्यावर आमदारांचे भाव वाढणारच ना…”
बोलण्यात काहीच अर्थ नव्हता…
बाहेर आलो
सगळे प्रश्न फेर धरून उभे राहीले
मी म्हणालो ” थांबा हे सारे तुमच्यासाठी च सुरू आहे.
तुम्हाला निधी मिळावा म्हणून ते भांडताहेत
आमदारांना मंत्रिपद मिळेल
मतदारसंघाला निधी मिळेल
ठेकेदारांना त्यातून कामे मिळतील
तुम्हालाही विकासकामाचे अर्थ कळतील…
तोपर्यंत ब्रेकिंग न्यूज बघत राहा…
हेरंब कुलकर्णी
8208589195
(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)