मुक्तपीठ टीम
तीर्थस्थळी भक्तांची प्रचंड गर्दी असतेच असते. काही भक्तांकडून तीर्थस्थळी होणारी अस्वच्छता हा चिंतेचाच विषय. तीर्थस्थानी मनातील भक्तिभावासह आलेल्या भक्तांना ही अस्वच्छता डाचणारीच. या अस्वच्छतेला दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छ तीर्थयात्रेवर भर देत केंद्र सरकारने पहिला टप्पा म्हणून उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि ओडिशा सरकारला निर्देश दिले आहेत. यामध्ये या राज्यांना केदारनाथ यात्रेसह चार धाम यात्रा, आगामी अमरनाथ यात्रा आणि जगन्नाथ रथयात्रेत कमालीची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी यांनी यासंदर्भात तीन राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापनासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर महिला आणि पुरुषांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि ओडिशामधील तयारीचा आढावा घेण्यासाठी टीम नियुक्त करण्यात आली आहे. ही टीम तेथे जाऊन स्वच्छता राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच स्वच्छतेबाबत आपल्या सूचना देणार आहेत. पुढील आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तयारीबाबत राज्य, शहर आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता राखण्याचे निर्देश
- सर्व शौचालये नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य ठेवावीत.
- यासोबतच तीर्थक्षेत्राकडे जाणार्या रस्त्यांलगत असलेले ढाबे, रेस्टॉरंट आणि इतर खाण्यापिण्याची दुकाने स्वच्छ करून याठिकाणी कचरा उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
अमरनाथ आणि जगन्नाथ यात्रेचे व्यवस्थापन
- उत्तराखंडमधील बद्रीनाथ यात्रा ८ मेपासून तर केदारनाथ यात्रा ६ मेपासून सुरू आहे.
- त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून ती ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
- ओडिशामध्ये १ जुलैपासून जगन्नाथ यात्रा होणार आहे.