मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्सने पुन्हा एकदा एक मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेतील फोर्डचा भारतातील प्रकल्प ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्स आणि फोर्ड इंडियामध्ये गुजरातमधील उत्पादन प्रकल्पासाठीच्या सामंजस्य करारावर नुकत्याच सह्या झाल्या. टाटा मोटर्सने “न्यू फॉरएव्हर” उत्पादनांच्या रेंजसह आपल्या ग्राहकांमध्ये जबरदस्त वाढ केली आहे. भविष्यातील वाहनांची योजना आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील गुंतवणूक यामुळे ही वाढीची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. ही वाढ टिकवून ठेवण्यासाठी येत्या काही वर्षांत टाटा मोटर्सला पीव्ही/ ईव्ही उत्पादन क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळेच फोर्डचा उत्पादन प्रकल्प ताब्यात घेणे हे महत्वाचं आहे.
सानंद येथील फोर्ड इंडिया वाहन उत्पादन प्रकल्प ही अत्याधुनिक साइट आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड नवीन यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे युनिटला त्याच्या वाहनांच्या उत्पादनासाठी सज्ज करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी आवश्यक आहे. या गुंतवणुकीमुळे प्रतिवर्षी ३ लाख युनिट्स उत्पादनाची क्षमता स्थापित होईल. ही क्षमता ४ लाख युनिट्सपेक्षा जास्त वाढवता येईल. यास काही महिने लागतील असा अंदाज आहे. या युनिटच्या संभाव्य संपादनासाठी हा सामंजस्य करार, हा टाटा समुहाच्या सर्व भागधारकांसाठी एक लाभदायी निर्णय ठरु शकणार आहे.
या प्रसंगी बोलताना, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “टाटा मोटर्सचे गुजरातमध्ये एक दशकाहून अधिक काळ मजबूत अस्तित्व असून सानंद येथे स्वतःच्या उत्पादन सुविधा आहेत. हा सामंजस्य करार अधिक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करून राज्याप्रती आमची बांधिलकी अधिक दृढ करतो. टाटा मोटर्सने बनवलेल्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकांच्या वाढत्या पसंतीमुळे गेल्या काही वर्षांत कंपनीची अनेक पटींनी वाढ झाली आहे. हा संभाव्य व्यवहार क्षमतेच्या विस्तारास मदत करेल, त्यामुळे भविष्यातील वाढ, प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आमचे स्थान आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल.”
या सामंदस्य करारानंतर टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील निश्चित व्यवहार करारांवर पुढील काही आठवड्यांत स्वाक्षरी केली जाईल.