मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने सहाव्या जागेसाठी आपला तिसरा उमेदवार कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना घोषित केल्याने शिवसेनेसमोर कडक आव्हान उभं राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे, असं म्हटलं होतं. त्यावरून महविकास आघाडीला राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो फॉर्म्युला सांगितला आहे, तो आघाडीला मान्य होईल, असा नाहीच!
काय म्हणाले फडणवीस?
- आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत.
- त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. मग घोडेबाजाराचा प्रश्नच उद्भवणार नाही. जरी त्यांनी उमेदवार ठेवला तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार भाजपाचे आहेत. महाराष्ट्रातील आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. काही लोकं आम्हाला मतदान करणार आहेत. याचा आम्हाला विश्वास आहे. यावेळी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरलाय तो काही विचारपू्र्वक भरला आहे.
- त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी रस्सीखेच!
- देशात राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
- या जागांसाठी महाराष्ट्रातून ७ उमेदवार आहेत.
- महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
- यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- दुसरीकडे, संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजपा दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार आहे.
- तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आहेत.